
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई : बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पुणे : शिक्षण म्हणून नोकरी करताना वेतन मिळण्याकरिता आवश्यक असलेले ‘शालार्थ आयडी’ मिळण्याकरिता देण्यात आलेला प्रस्ताव मंजूर करून देण्यासाठी तब्बल एक लाख रुपयांची लाच मागून ती स्वीकारताना शिक्षण उपनिरीक्षकाला रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई शिक्षण उपसंचालक कार्यालयात करण्यात आली. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या कारवाईच्या निमित्ताने शिक्षण उपसंचालक कार्यालयातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला आहे.
रावसाहेब भगवान मिरगणे (वय ५७, रा. ग्रीनव्हील सोसायटी, डीपी रोड, मावळा हॉटेल जवळ, हडपसर) असे या लाचखोर शिक्षण उपनिरीक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी एका ५६ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. एसीबीकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांची पत्नी सोलापूर जिल्ह्यात एका माध्यमिक शाळेत सहशिक्षिका म्हणून नोकरीस आहे. त्यांना शालार्थ आयडी’ नसल्याने त्या २०१६ पासून विना वेतन काम करीत आहेत. त्यांचा शालार्थ आयडी मंजूर झाल्यानंतर त्यांना वेतन सुरु होणार होते. हा शालार्थ आयडी मंजूर करण्यासाठी तक्रारदार यांनी त्यांच्या पत्नीचा शालार्थ आयडीचा प्रस्ताव १६ जून २०२५ रोजी त्यांच्या विभागाच्या शिक्षणाधिकाऱयांमार्फत विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय, पुणे येथे दाखल केला होता.
हा प्रस्ताव ‘ई- ऑफिस’ मार्फत विभागीय शिक्षण उपसंचालक, पुणे यांना सादर करण्यासाठी व तो प्रस्ताव मंजूर करून देण्यासाठी विभागीय शिक्षण उप संचालक यांच्या कार्यालयातील शिक्षण उपनिरीक्षक आरोपी लोकसेवक रावसाहेब मिरगणे यांनी तक्रारदार यांच्याकडे 1 लाख रुपयाच्या लाचेची मागणी केली. लाच द्यावयाची नसल्याने यासंदर्भात एसीबीकडे १७ नोव्हेंबर २०२५ रोजी तक्रार करण्यात आली.या तक्रारीच्या अनुषंगाने १७ नोव्हेंबर आणि २१ नोव्हेंबर रोजी लाच मागणीची पडताळणी करण्यात आली.
२१ नोव्हेंबर रोजी विभागीय शिक्षण उपसंचालक, पुणे यांच्या कार्यालयात झालेल्या पडताळणी दरम्यान आरोपी लोकसेवक रावसाहेब मिरगणे याने तक्रारदाराच्या पत्नीची ‘शालार्थ आयडी’ मंजूर करून देण्यासाठी एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून ती लाच रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आरोपी मिरगणे याने लाचेची रक्कम घेऊन तक्रारदाराला शिक्षण उपसंचालक कार्यालयातील स्वतःच्याच कक्षात संध्याकाळी सव्व्वा सहाच्या सुमारास बोलावले. स्वतःच्या केबिनमध्ये तक्रारदाराकडून एक लाख रुपयाची लाच पंचासमक्ष स्वीकारल्यानंतर त्याला रंगेहाथ पकडण्यात आले.
आरोपी मिरगणे याला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अजीत पाटील, अर्जुन भोसले, यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त सतीश वाळके, पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे यांच्या पथकाने केली.







