भामट्याने ज्येष्ठ नागरिकाला फसवून चोरुन नेली १३ ग्रॅमची सोन्याची अंगठी
मंदिरात दान करायचे असल्याची केली बतावणी, सिंहगड रोडवरील घटना
पुणे : माझे नातेवाईक मयत झाले आहेत, मंदिरात पैसे दान करायचे आहे, असे सांगून एका भामट्याने ज्येष्ठ नागरिकाला सोन्याची अंगठी काढायला लावून हातचलाखी करुन अंगठी चोरुन नेली.
याबाबत हिंगणे खुर्द येथे राहणार्या ७१ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना सिंहगड रोडवरील माणिकबाग येथील ब्रम्हा हॉटेलशेजारी शनिवारी दुपारी साडेचार वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शनिवारी दुपारी पायी जात होते. त्यावेळी मोटारसायकलवरुन एक जण आला. त्याने माझे नातेवाईक मयत झाले आहेत. त्याकरीता मला मंदिरामध्ये ५ हजार रुपये दान करायचे आहेत. मी तुमच्याकडे ५ हजार रुपये देतो, ते तुम्ही मंदिराचे दानपेटीत टाका, असे म्हणून त्याने त्याचे जवळील पुजेच्या सामानाची प्लास्टीकची पिशवी फिर्यादीच्या हातात दिली. सध्या चोरीच्या घटना घडत आहेत. तुम्ही हातातील सोन्याची अंगठी पिशवीत काढून ठेवा, असे म्हणाला. तेव्हा त्यांनी उजव्या हाताच्या बोटातील १३ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी या भामट्याने दिलेल्या प्लास्टिकच्या पिशवीत ठेवली. त्यावेळी या भामट्याने ५ हजार रुपये पिशवीत टाकल्याचा बहाणा करुन त्यांनी टाकलेली सोन्याची अंगठी हातचलाखी करुन काढून घेऊन तो पळून गेला. पोलीस हवालदार तारु अधिक तपास करीत आहेत.


