पिस्तुलाचा धाक दाखवून लुटमार करणारा तोतया पोलीस गजाआड
दिवाळीसाठी गावाला जाणार्या कामगाराला लुबाडले, बाणेर पोलिसांची कामगिरी
पुणे : दिवाळीनिमित्त गावाला जाताना खरेदी करण्यासाठी एटीएममधून पैसे काढून जाणार्या कामगाराला अडवून पोलीस असल्याची बतावणी करुन पिस्तुलाचा धाक दाखवुन लुटमार करणार्या तोतयास बाणेर पोलिसांनी गजाआड केले आहे़ बाणेर पोलिसांनी बाणेर परिसरातील सुमारे साडेतीनशे सीसीटीव्ही फुटेज तपासून या सराईत चोरट्याला पकडले आहे.
श्रीराम विकास हानवते (वय ३३, रा. एलिंगट रेसिडेंन्सी, यमुनानगर निगडी) असे या चोरट्याचे नाव आहे.
याबाबत किसनकुमार पोराराम ध्रुव (वय २७, रा. लेबर कॅम्प, पाषाण) यांनी बाणेर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार बाणेरमधील पासपोर्ट कार्यालयासमोर १९ आॅक्टोंबर रोजी घडला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किसनकुमार ध्रुव हे गवंडी काम करत असून ते मुळचे छत्तीसगड येथील राहणारे आहेत. त्यांनी दिवाळी सणाकरीता खरेदीसाठी बाणेर रोडवरील एटीएममधून पैसे काढले व आपल्या दोन सहकार्यांसह ते दुपारी पायी जात होते. त्यावेळी श्रीराम हानवते हा दुचाकीवरुन आला. त्याने ध्रुव व त्यांच्या मित्रांना अडविले. त्याने खाकी रंगाचे जॅकेट घातले होते. पोलिसांसारखे बुटही त्याने घातले होते. पोलीस असल्याची बतावणी करुन त्यांना म्हणाला की, तुम्ही चोरी केली आहे. मला तुमची झडती घ्यायची आहे. तुमचे नाव सांगा व आधार कार्ड द्या. तुम्ही पळून जाण्याचा प्रयत्न केला तर गोळी मारील, असे सांगून कमरेचे पट्याला लावलेली पिस्तुल दाखविली. त्यांची झडती घेऊन खिशातील १३ हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. हे चोरीचे पैसे आहेत, असे म्हणून त्यांच्याबरोबरच्या दोघांना पोलीस ठाण्यात या असे सांगून त्यांना घेऊन तो दुचाकीवरुन तेथून निघाला. वाटेत त्याने तुमच्या आधार कार्डची झेरॉक्स काढावी लागेल, असे म्हणून एका बोळात नेले. त्यांच्याकडून आधार कार्ड घेऊन खाली उतरण्यास सांगितले. तो पळून गेला. त्यांनी ११२ वर कॉल केल्यावर पोलीस आले. पोलिसांनी एका दुकानातील सीसीटीव्ही तपासले. त्यावरुन आरोपीचा शोध घेण्यासाठी परिसरातील सुमारे साडेतीनशे सीसीटीव्ही तपासून तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपी निष्पन्न केला. श्रीराम हानवते याला अटक केली.
आरोपी हानवते हा सराइत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात एटीएमची तोडफोड करुन रोकड चोरीचा प्रयत्न, तसेच निगडी पोलीस ठाण्यात लूटमारीचा गुन्हा दाखल आहे. प्राथमिक तपासात हानवतेने एटीएममधून पैसे काढणार्या परराज्यातील कामगारांना पोलीस असल्याची बतावणी करुन लूटमारीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी सांगितले.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त सोमय मुंढे, सहायक पोलीस आयुक्त विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली बाणेर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, सहायक पोलीस निरीक्षक के. बी. डाबेराव, पोलीस उपनिरीक्षक संदेश माने, पोलीस कर्मचारी बाबा आहेर, किसन शिंगे, अप्पा गायकवाड, संदेश निकाळजे, अतुल इंगळे, गजानन अवतिरक, प्रदीप खरात, प्रीतम निकाळजे यांनी केली आहे.


