
रांजणगावातील ३५ लाखांचे फ्रिज पाठविले होते राजकोटला पोहचले नंदुरबारला
लोणीकंद पोलिसांनी आरोपीसह नंदुरबारमधून केला माल जप्त
पुणे : रांजणगाव येथील हायर कंपनीच्या मोदामातून राजकोट येथील कंपनीला ३५ लाख रुपयांचे १२० फ्रिज कंटेनरने पाठविण्यात आले होते. परंतु, ते राजकोटला न जाता कंटेनर नंदुरबार येथे बेवारस आढळला. लोणीकंद पोलिसांनी चोरट्याला पकडून अपहार केलेले सर्व माल नंदुरबारमधील एका घरातून जप्त केला आहे.
निसार अहमद इसाक खान ( वय ३५, रा. शास्त्री मार्केट, मंगल बाजार, नंदुरबार) असे अटक केलेल्या कंटेनर चालकाच्या साथीदाराचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कटकेवाडी येथील मारुती वेयर हाऊस मधून भगवती ट्रान्स्पोर्टच्या कंटेनरमधून हायर कंपनीचे १२० फ्रिज राजकोटच्या शिल्पा इलेक्ट्रॉनिकला २५ सप्टेंबरला पाठवण्यात आले होते. २७ सप्टेंबरला ते राजकोटला पोहचले नाहीत. तेव्हा भगवतीच्या मॅनेजरने कंटेनरचे जीपीएस तपासले. त्याचे लोकेशन सुरत येथे दाखवले. चालकाचा मोबाईल बंद होता. त्यांनी दुसरा चालक तेथे पाठवला तर तेथे कंटेनर नव्हता. त्यांनी लोणीकंद पोलिसांकडे फिर्याद दिली.
पोलीस उपनिरीक्षक अर्जुन बेंडगुडे व त्यांचे सहकारी कंटेनरचा शोध घेत असताना तो नंदुरबार येथील आर के पेट्रोलियम येथे बेवारस स्थितीत सापडला. कंटेनर चालक व त्यातील मालाचा शोध घेतला असता बातमीदारकडून पोलिसांना कंटेनर चालकाच्या साथीदाराची माहिती मिळाली. पोलिसांनी निसार खान याला ताब्यात घेतले. तेथील एका खेडेगावातील घरामधून हायर कंपनीचे ३५ लाख ७९ हजार ६६० रुपयांचे १२० फ्रिज हस्तगत केले.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सजेर्राव कुंभार, पोलीस उपनिरीक्षक अर्जुन बेंडगुडे, पोलीस अंमलदार कैलास साळुंखे, सागर जगताप, स्वप्नील जाधव, संतोष अंदुरे, मल्हारी सपुरे, शुभम चिनके, किरण पलांडे, अमोल ढोणे, सुधीर शिवले यांनी केली आहे.


