
चारित्र्याच्या संशयावरुन गर्भवती पत्नीचा केला खुन
हातावरील गोंदलेल्या नावावरुन पोलीस पोहचले पतीपर्यंत, भिगवणमधील घटना
पुणे : बारामती ते भिगवण रोडवरील मदनवाडी गावाजवळील ओढ्याचे पुलाखाली ब्लँकेटमध्ये गुंडाळलेला सडलेल्या अवस्थेतील महिलेचा मृतदेह पोलिसांना आढळून आला होता. या महिलेच्या हातावर गोंदवलेले रवीराज हे नाव या एकमेव धाग्यावरुन पोलीस खुन्यापर्यंत पोहचले. त्यातून पत्नीच्या प्रेमसंबंधाच्या संशयावरुन गर्भवती पत्नीच्या डोक्यात लोखंडी वस्तूने मारुन तिचा खुन केल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी पतीला अटक केली.
सुदर्शन ऊर्फ रविराज रणजित जाधव (वय ३६, रा. कटफळ, ता. बारामती) असे अटक केलेल्या पतीचे नाव आहे़ दीपाली सुदर्शन जाधव (वय ३०, रा. कटफळ, ता. बारामती) असे खुन झालेल्या महिलेचे नाव आहे.
महिलेचा खुन करुन पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह ब्लँकेटमध्ये बांधून ओढ्यात फेकून दिला होता. स्थानिक गुन्हे शाखा व भिगवण पोलीस ठाण्याकडील अधिकारी व अंमलदार यांची तीन पथके तयार करण्यात आली. मृतदेह कुजलेल्या स्थितीत मिळाला होता. तपास पथकाला मृतदेहाचा फोटो तसेच तिच्या हातावरील रवीराज हे इंग्रजी अक्षरातील नाव गोंदणाचा फोटो घेण्यात आला. आजूबाजूचे नागरिक, बारामती विभागातील सर्व पोलीस ठाणी तसेच बातमीदार यांना हे फोटो पाठविण्यात आले. त्यातून महिलेची ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरु होता. गोंदण असलेला मृतदेह हा दीपाली सुदर्शन जाधव हिचा असण्याची शक्यता असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन पोलिसांनी सुदर्शन जाधव याला ताब्यात घेतले. तेव्हा त्याने पत्नी बेपत्ता असल्याची १४ ऑक्टोंबर रोजी बारामती तालुका पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली असल्याचे सांगितले. मृतदेहाचे हातावरील गोंदण हे सुदर्शन याने ओळखले असून हा मृतदेह आपल्या पत्नीचा असल्याचे सांगितले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत विसंगती आढळून आली. त्याच्यावर संशय बळावल्याने अधिक सखोल चौकशी केल्यावर त्याने पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयावरुन होता. दीपाली गर्भवती होती. तिच्या पोटातील बाळावरुन त्यांच्यात १२ ऑक्टोंबर रोजी सकाळी ९ वाजता राहते घरी डोक्यात लोखंडी वस्तुने मारहाण केली व तिचा खुन केला. मृतदेह ब्लँकेटमध्ये गुंडाळून तो पुलाखाली टाकून दिल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याला अटक करुन न्यायालयात हजर केले़ न्यायालयाने त्याला ३१ ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
ही कामगिरी पोलीस विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी, पोलीस अधीक्षक संदिपसिंग गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी मधुकर भट्टे, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, भिगवण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे, सहायक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ, पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब कारंडे, पोलीस अंमलदार अभिजित एकशिंगे, स्वप्निल अहिवळे, अतुल डेरे, ज्ञानेश्वर क्षीरसागर, अजय घुले, निलेश शिंदे, अजय देडे, सचिन पवार, महेश उगले, रामदास करचे, संतोष मखरे, गणेश करचे, अप्पा भांडवलकर, रणजित मुळीक, मयुर बोबडे, विठ्ठल वारघड, वर्षा, जामदार, कविता माने, पोलीस पाटील शामल पवार यांनी केली आहे.



