
ऑनलाईन गेममधून दागिन्यांची खंडणी घेणारी टोळी गजाआड
शाळकरी मुलगा टारगेट, शिक्रापूर पोलिसांची कारवाई, पालकांना सावध करणारी घटना
पुणे : ऑनलाईन गेमच्या आहारी गेलेल्या शाळकरी मुलाला गेमिंगचा आयडी देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून साडेतीन लाखांचे दागिने घेणार्या दोघांना शिक्रापूर पोलिसांनी अटक केली आहे. ऑनलाईन गेममध्ये आपली मुले एखाद्या टोळीचे टारगेट ठरत नाही ना, याकडे सर्वांचे डोळे उघडविणारी घटना समोर आली आहे.
याप्रकरणी मयूर ऊर्फ शशिकांत मुंजाजी भिसाड (वय २१, रा. परभणी) आणि किशोर डहाळे (वय २२, रा. परभणी) यांना अटक करण्यात आली. याबाबत शाळकरी मुलाच्या वडिलांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती, अशी माहिती पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नगर रस्त्यावरील कोरेगाव भीमा भागातील एक शाळकरी मुलगा ऑनलाइन गेमच्या आहारी गेला होता. आरोपी भिसाड याच्याशी मुलाची सोशल मीडियावर ओळख झाली होती. भिसाड याने ऑनलाईन गेमच्या ‘गेमिंग आयडी’ देतो, असे आमिष दाखवून जाळ्यात ओढले. त्यानंतर मुलाला घरातून ५ तोळे सोन्याचे दागिने आणण्यास प्रवृत्त केले. मुलाने घरातून घेतलेले साडेतीन लाखांचे दागिने आरोपी भिसाड याला नेऊन दिले. त्यानंतर भिसाडने हे दागिने परभणीतील साथीदार डहाळे याला दिले. आयडी दिल्यानंतरही त्या पुढे चालत नसल्याने त्यासाठी आरोपींनी मुलाकडे सोन्याचे दागिने व ५० हजार रुपयांची खंडणी मागितली. ही बाब त्याच्या वडिलांना समजल्यावर त्यांनी शिक्रापूर पोलिसांकडे फिर्याद दिली.
हे प्रकरण संवेदनशील असल्याने पोलीस अधीक्षक संदिपसिंग गिल यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या नेतृत्त्वाखाली विशेष तपास पथक तयार केले. तांत्रिक तपासात शाळकरी मुलगा आणि आरोपी भिसाड हे एकमेकांच्या संपर्कात असल्याचे उघड झाले. दोघांमध्ये सोशल मीडियावर संपर्क असल्याचे दिसून आले. भिसाडने मुलाला ‘गेमिंग आयडी’ देण्याचे आमिष दाखवून घरातून दागिने आणण्यास सांगितले. याबाबतची माहिती तपासात मिळाल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपास करुन भिसाडला ताब्यात घेतले. त्याने हे दागिने किशोर डहाळे याच्याकडे विक्री केल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन विकत घेतलेल्या दागिन्यांपैकी त्याच्याकडून एक लाख ६२ हजारांचे २३ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले.
ही कामगिरी विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड, सहायक निरीक्षक राहुल देशमुख, विनायक मोहिते, प्रताप कांबळे यांनी केली आहे.
मुलांवर लक्ष ठेवावे
शाळकरी मुले सोशल मीडियावर विविध आमिषांना बळी पडत असल्याचे दिसून आले आहे. ऑनलाईन अभ्यासासाठी मुलांना मोबाईल दिल्यानंतर मुलांकडून मोबाईलचा गैरवापर होत आहे. मोबाइल फक्त गरजेपुरता वापरण्यास देणे. मुलांना मोबाईल दिल्यानंतर ते अनावश्यक वेबसाईट पाहतात का?. याबाबत पालकांनी मुलांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. मुलांना आमिष दाखवून त्यांची फसवणूक करण्याचे प्रकार निदर्शनास आल्यास पालकांनी त्वरीत पोलिसांकडे तक्रार द्यावी, असे आवाहन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी केले आहे.



