
महिलेवर अत्याचार करणार्या नराधमाच्या आवळल्या मुसक्या
लिफ्ट देण्याचा केला होता बहाणा, रेखाचित्रावरुन ग्रामीण पोलिसांनी काढले शोधून
पुणे : महामार्गावर वाहनांची वाट पहात असलेल्या महिलेला लिफ्ट देण्याचा बहाणा करुन महिलेला जबरदस्तीने झाडीत नेऊन तिच्यावर अत्याचार केला. ग्रामीण पोलिसांनी या नराधमाला रेखाचित्रावरुन शोधून काढून त्याच्या मुसक्या आवळल्या.
जाक्या कोंडक्या चव्हाण (वय ३०, रा. माळवाडी, लिंगाळी, ता. दौंड) असे या नराधमाचे नाव आहे. ही घटना मळद गावाजवळील रेल्वे पुलाखाली १० ऑक्टोंबर रोजी पहाटे साडेतीन वाजता घडली होती.
पिडित महिला भिगवण येथे पुण्याकडे जाण्याकरीता महामार्गालगत वाहनाची वाट पहात उभी होती. तिला एकाने लिफ्ट देण्याचा बहाणा केला. मोटारसायकलवरुन घेऊन जात असताना मळद गावाचे हद्दीतील रेल्वे पुलाजवळ मोटारसायकल थांबवून त्याने महिलेला जबरदस्तीने रोडलगतच्या झाडीमध्ये घेऊन जाऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तिला तेथेच सोडून तो पळून गेला. या महिलेने भिगवण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी घटनास्थळाला भेट दिली. महिलेने सांगितलेल्या वर्णनावरुन रेखाचित्र तयार करण्यात आले. भिगवण, दौंड आणि स्थानिक गुन्हे शाखेची मिळून ३ पथके तयार करण्यात आली. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. परंतु, उपयुक्त माहिती मिळाली नाही. सर्व बातमीदारांना हे रेखाचित्र पाठविण्यात आले. त्यातून एका बातमीदाराने तपास पथकाला माहिती दिली की, हे रेखाचित्र जाक्या कोंडक्या चव्हाण याच्या वर्णनाशी मिळते जुळते आहे. त्यावरुन पोलिसांनी चव्हाण याला लिंगाळी परिसरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने गुन्हा कबुल केला़ न्यायालयाने त्याला २६ ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही कामगिरी विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार, उपविभागीय पोलीस अधिकारी बापुराव दडस, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार, भिगवण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ, पोलीस उपनिरीक्षक रुमेश कदम, अमित पाटील, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब कारंडे, पोलीस अंमलदार सुभाष राऊत, नितीन बोराडे, ,अमीर शेख, सचिन पवार, संतोष मखरे, महेश उगले, अभिजित एकशिंगे, स्वप्निल अहीवळे, निलेश शिंदे, अजय घुले यांनी केली आहे.



