
प्रेमसंबंधातून मावसभावाची विचारणा करुन तरुणावर कोयत्याने वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न
नागरिक दिवाळीत मग्न असताना खडकी पोलिसांनी १२ तासात आरोपींचा आवळल्या मुसक्या
पुणे : प्रेमसंबंधातून मावस भावाविषयी विचारणा केल्यावर माहित नाही, असे उत्तर दिल्याने तरुणावर तिघांनी कोयत्याने वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. नागरिक दिवाळी सण साजरा करण्यात मग्न असताना खडकी पोलिसांनी तिघा आरोपींच्या १२ तासाच्या आत मुसक्या आवळल्या़
या घटनेत रोहित अमर उबाळे (वय २५, रा. तुकाराम देवकुळे पथ, नटराज चौक, बोपोडी) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत.
दीपक जगदीश कोरी (वय २०, रा. भाऊपाटील चाळ, बोपोडी), करण केविन पॅट्रिक (वय २०, रा. गोपी चाळ, मुंबई पुणे रोड, बोपोडी) आणि सिंधु ऊर्फ फॉरेनर सचिन ढवळे (वय २०, रा. नाईट चाळ, बोपोडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. खडकी पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना बोपोडीतील तुकाराम देवकुळे पथ येथे २० आॅक्टोंबर रोजी रात्री पावणे बारा वाजता घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची लहान बहीण स्नेहा व आरोपी दिपक कोरी याची बहिण लक्ष्मी या दोघी मैत्रिणी आहेत. दिवाळी सणानिमित्त स्नेहाच्या हातावर मेंदी काढण्यासाठी लक्ष्मी त्यांच्या घरी आली होती. फिर्यादीचा मावस भाऊ दक्ष सोळंखी व लक्ष्मी यांच्यात प्रेमसंबंध आहेत़ याची माहिती दीपक कोरी याला समजली़ त्याचा राग मनात धरुन तो दोन मित्रांना घेऊन रात्री उबाळे यांच्या घराबाहेर आला होता. त्याने स्नेहा हिला घराबाहेर बोलावून दक्ष कोठे आहे, अशी चौकशी केली. त्यावेळी रिक्षात बसलेला रोहित हा त्यांच्याजवळ गेला. दीपक कोरी याने रोहित याला दक्ष कोठे आहे, याची विचारणा केली. तेव्हा त्याने मला माहिती नाही, असे असे सांगितले़ ते ऐकून इतर दोघांनी रोहित याच्या कानाखाली मारली. धक्काबुक्की करुन त्याला पकडून ठेवले. दीपक कोरी याने कमरेजवळील कोयता काढून त्याचा रोहित उबाळे याच्या छातीवर, हातावर वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.
संपूर्ण शहरात दिवाळीची आतषबाजी होत असताना बोपोडीत रक्तरंजित घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली़ पोलीस उपनिरीक्षक दिग्विजय चौगले व त्यांच्या सहकाºयांनी आरोपींचा शोध सुरु केला. पोलीस अंमलदार सुधाकर डिके यांना माहिती मिळाली की, दीपक कोरी हा काही दिवसांकरीता शहर सोडून जात आहे़ पैसे व कपडे घेण्यासाठी हरिष ब्रीजखाली येणार आहे. या माहितीच्या आधारे पोलीस अंमलदार आबा केदारी, गालीब मुल्ला, शशांक डोंगरे, अनिकेत भोसले, ऋषी दिघे हे वेशांतर करुन हरिष ब्रीजखाली वेगवेगळ्या ठिकाणी दबा धरुन बसले. मिळालेल्या माहितीप्रमाणे काही वेळाने दीपक कोरी तेथे आला. चौगले यांनी इशारा करताच पोलिसांनी त्याच्यावर झडप घालून पकडले. त्याच्या चौकशीत इतरांची नावे निष्पन्न होऊन पोलिसांनी त्यांनाही अटक केली़
जुन्या भांडणाच्या कारणावरुन आपली दहशत निर्माण करण्यासाठी त्यांनी हा गुन्हा केला होता. त्यामुळे पोलिसांनी गुन्हा घडला, त्या घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी तिघांना घेऊन जाऊन त्यांची धिंड काढली. सणाच्या दिवशीही पोलीस जनतेच्या सुरक्षेसाठी तत्पर असतात, हे खडकी पोलिसांनी कृतीतून दाखवून दिले़
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, सहायक पोलीस आयुक्त विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रमसिंह कदम, पोलीस उपनिरीक्षक दिग्विजय चौगले, पोलीस हवालदार शशिकांत सपकाळ, पोलीस अंमलदार आबा केदारी, गालीब मुल्ला, शशांक डोंगरे, अनिकेत भोसले, ऋषि दिघे यांनी केली आहे.