
पत्नीला मारहाण करणार्या पोलीस अंमलदारावर गुन्हा दाखल
आईवडिलांच्या विरोधात केला होता प्रेमविवाह, ऐन दिवाळीतील खडकमाळ पोलीस लाईनीतील घटना
पुणे : आईवडिलांच्या विरोधात जाऊन पोलीस अंमलदाराने प्रेमविवाह केला. पण, लग्नानंतर ती सासरी नांदायला आल्यावर त्याने पत्नीचा छळ सुरू केला. ऐन दिवाळीत आजारी पत्नीने मला दवाखान्यात जाऊन जा, म्हटल्यावर तिला मारहाण करून जखमी केले. पोलिसांनी तिला मदत करुन रुग्णालयात दाखल करुन या पोलीस अंमलदाराबरोबर त्याच्या आईवडिलावर गुन्हा दाखल केला आहे.
ज्ञानेश्वर गोपाळ तायडे (वय २८), गोपाळ तायडे (वय ५३), अंजना गोपाळ तायडे (वय ४५, सर्व रा. खडकमाळ पोलीस लाइन) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
ज्ञानेश्वर गोपाळ तायडे याची पत्नी काजल (वय २७) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
ज्ञानेश्वर हा पुणे पोलीस दलात बॅन्डसमन म्हणून पोलीस मुख्यालयात नेमणुकीस आहेत. ते फिर्यादीचे नातेवाईक आहेत. फेसबुक वरून त्यांच्यात मैत्री होऊन जास्त ओळख झाली. त्याने आई वडिलांचा विरोध असताना ७ सप्टेंबर २०२२ रोजी प्रेम विवाह केला. विवाहाला त्याचे वडिल आले नाहीत. त्यानंतर डिसेंबर २०२२ मध्ये त्या खडकमाळ पोलीस वसाहतीत रहायला आल्या. त्यानंतर त्यांच्यात बदल झाला. ज्ञानेश्वर हा कधीतरी त्यांच्याकडे येत असत. तो घरात किराणा सामान भरण्यासाठीही पैसे देत नाहीत. फिर्यादी यांना किरकोळ कारणावरून शिवीगाळ, मारहाण करत. त्याचे आई वडील फिर्यादीला म्हणत असत की, तू ज्ञानेश्वरबरोबर प्रेमविवाह केल्याने आम्हाला काही मिळाले नाही. तू इथे राहू नकोस, मी त्याचे लग्न भावाच्या मुलीबरोबर लावून देते, असे म्हणून सतत शिवीगाळ करत असत. त्यांना ११ सप्टेंबर २०२५ रोजी दुसरी मुलगी झाली, तरी त्याच्या वागण्यात सुधारणा झाली नाही. दिवाळीच्या दिवसात सामान भरण्यासाठी पैसे मागितले तर, त्याने पैसे दिले नाही. गेल्या ४, ५ दिवसापासून फिर्यादी आजारी होत्या, तेव्हा सोमवारी २० ऑक्टोंबर रोजी त्यांनी मला दवाखान्यात जाऊन जा, असे म्हटल्यावर त्याने तिला मारहाण केली. या मारहाणीत तिच्या कंबरेला दुखापत झाली. ती जागची हलू शकत नव्हती. शेवटी तिने ११२ वर फोन करुन पोलीस मदत मागितली. पोलिसांनी रुग्णवाहिका बोलावून तिला ससून रुग्णालयात दाखल केले. उपचार घेतल्यानंतर त्यांनी फिर्याद दिली असून सहायक पोलीस निरीक्षक अलका जाधव तपास करीत आहेत.