
बांधकाम विभागातील दोन अभियंते निलंबित, आरोग्य विभागातील चौघांवर दंडात्मक कारवाई
पुणे : शहरात दिवाळीच्या सुट्ट्या सुरू असतानाच महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी प्रशासनात धडाकेबाज कारवाई केल्याने अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. अनधिकृत बांधकामाकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी बांधकाम विभागातील दोन अभियंत्यांना निलंबित करण्यात आले असून, अस्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या आरोग्य विभागातील चार कर्मचाऱ्यांवर आर्थिक दंड ठोठावण्यात आला आहे.
बाणेरमधील सर्वे क्रमांक २१६ मधील टीडीआर खर्ची टाकलेल्या जागेवर सहावा आणि सातवा मजला मान्य नकाशाबाहेर बांधण्यात येत असल्याचे आढळून आले. प्रत्यक्ष पाहणीत सहावा मजला पूर्ण व सातव्या मजल्याचे काम सुरू असल्याचे दिसले. या अनधिकृत बांधकामाकडे दुर्लक्ष करून संबंधित अधिकाऱ्यांनी महापालिकेला माहिती दिली नव्हती. कनिष्ठ अभियंता शुभांगी तरुकमारे आणि उपअभियंता संदीप मिसाळ यांनी आपल्या जबाबदारीकडे दुर्लक्ष केल्याचे लक्षात आल्यानंतर आयुक्तांनी तत्काळ दोघांचे निलंबन केले आणि खातेनिहाय चौकशीचे आदेश दिले.
दरम्यान, आयुक्तांनी रविवारी (ता. १९) शिवाजीनगर–घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील दीप बंगला चौक ते वडारवाडी रस्ता परिसराची पाहणी केली असता ठिकठिकाणी कचरा पडलेला आढळला. परिसरात अस्वच्छता, दुर्गंधी आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती पाहून आयुक्तांनी अधिकाऱ्यांना जागेवरच खडसावले. समाधानकारक उत्तर न मिळाल्याने त्यांनी वरिष्ठ आरोग्य निरीक्षक सुनील कांबळे (₹५,००० दंड), आरोग्य निरीक्षक संगीता बदामी (₹४,००० दंड) तसेच मुकादम ललित मकवाणी आणि राज साळवी (प्रत्येकी ₹२,००० दंड) यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले.
दिवाळीच्या काळातही आयुक्त राम यांनी सुट्टी न घेता शहरातील विविध भागांची पाहणी सुरू ठेवली आहे. त्यांच्या दोन दिवसांच्या दौऱ्यातच दोन सहाय्यक आयुक्त आणि दोन उपअभियंत्यांच्या बदल्या, तर अन्य कर्मचाऱ्यांवर निलंबन आणि दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
प्रशासनातील ही सलग कारवाई पाहता आयुक्त आणखी मोठ्या स्तरावर पावले उचलतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. दिवाळीतही “ऑन फील्ड” राहून त्यांनी दिलेला हा संदेश स्पष्ट असल्याचे बोलले जात आहे.