
फसवून मंगळसुत्र चोरणार्या गुजरातच्या दोन महिला गजाआड
आंबेगाव पोलिसांनी ५० सीसीटीव्हीमार्फत सासवडवरुन घेतले ताब्यात
पुणे : किराणा दुकानात आलेल्या त्या दोन महिलांनी अगोदर सोन्याची रिंग दाखवून तिची काय किंमत येईल, अशी विचारणा केली. त्यानंतर मंगळसुत्राचे मणी दाखवून महिलेच्या गळ्यातील २ तोळ्याचे खरे मंगळसुत्र चोरुन नेले. आंबेगाव पोलिसांनी कात्रज ते सासवड मार्गावरील ५० सीसीटीव्ही फुटेज तपासून या दोन महिलांना सासवडवरुन ताब्यात घेतले.
आशाबेन मंगाभाई सरवय्या (वय ५०) आणि सोनुबेन आकाशभाई सरवय्या (वय ३०, दोघी रा. जुना कोडीत रोड, सासवड, मुळ रा. भावनगर, गुजरात) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत भारती योगेश पवार(वय ३५, रा. वसंततारा अपार्टमेंट, संतोषनगर, कात्रज) यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार कात्रज, संतोषनगरमधील ओम किराणा मालाचा दुकानासमोर १५ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता घडला.
फिर्यादी या दुकानात असताना दोन महिला आल्या. त्यांनी पिवळ्या धातूची रिंग दाखविली. सोनाराकडून याचे किती पैसे येतील, अशी चौकशी केली. ती सोन्याची रिंग होती. त्यानंतर त्यांनी लाल कागदात सोन्याचे मणी दिले. त्यांच्या गळ्यातील मंगळसुत्रापेक्षा ते जड असल्याचे सांगून विश्वास संपादन केला. त्यांना हे मणी देऊन त्यांच्या गळ्यातील २ तोळ्याचे मंगळसुत्र घेऊन गेल्या.
आंबेगाव पोलिसांनी कात्रज ते सासवड मार्गावरील ५० पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. या महिला सासवड येथे गेल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलीस अंमलदार प्रमोद भोसले यांना त्यांच्या बातमीदाराकडून महिलांच्या राहत्या घराची माहिती मिळाली. पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर व त्यांच्या सहकार्यांनी सासवड येथे जाऊन दोघींना अटक केली. त्यांच्याकडून चोरलेले १ लाख रुपयांचे मंगळसुत्र जप्त केले आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने, पोलीस निरीक्षक गजानन चोरमले, पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर, पोलीस अंमलदार शैलेंद्र साठे, चेतन गोरे, हणमंत मासाळ, निलेश जमदाडे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, प्रमोद भोसले, ज्ञानेश्वर चित्ते, नितीन कातुर्डे, योगेश जगदाळे, शिवाजी पाटोळे, अजय कामठे, सुभाष मोरे, हरिश गायकवाड, राकेश टेकवडे, दीक्षा मोरे यांनी केली आहे.