
लाच लुचपत ची कारवाई, सेवा निवृत्त पोलिस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
पुणे : वीज चोरीच्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी 10 हजाराची मागणी करून 5 हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून कोंढवा पोलीस ठाण्यातील पोलीस आमदाराला रंगेहाथ पकडले. तसेच त्याला प्रोत्साहन देणाऱ्या सेवानिवृत्त पोलिस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमनाथ बापू महानवर (वय ३४, रा. ओम नमो रेसिडेन्सी, शेवाळवाडी ता. हवेली ) असे पोलिस अंमलदाराचे नाव आहे. युवराज कृष्णा फरांदे, (वय ५९, रा. स्वप्नपुर्ती बंगला, वृंदावन सोसायटी, उरूळी देवाची) असे सेवानिवृत पोलिस अधिकाऱ्याचे नाव आहे. कोंढवा पोलीस ठाण्यात दाखल असणाऱ्या वीज चोरीच्या गुन्ह्यामध्ये मदत करण्यासाठी तसेच या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी 10 हजार रुपयांची लाचेची मागणी केली यावर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीची पडताळणी करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावला असता महारनवर याने तक्रारदाराकडे लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
तक्रारदार व त्यांचे घरमालक हे आरोपी असलेल्या वीज चोरीच्या गुन्ह्यांमध्ये तक्रारदार यांचे घरमालकाकडून दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी यापूर्वीच त्याने ५ हजार रुपये घेतले होते. परंतू 5 हजार रुपये दिल्याबाबत इतरत्र चर्चा झाल्याने महारनवर याने तक्रारदार यांना पोलीस ठाण्यात बोलावून जे ५ हजार रुपये तू मला देणार होता ते तू तुझ्या घर मालकाला नेऊन दे असे बोलून लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच त्याच्या लाच मागणीस फरांदे याने फोनद्वारे प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाले.
तक्रारदार यांना व त्यांचे घर मालकास पोलीस ठाण्यात बोलावून तक्रारदार यांना त्यांचे घरमालक यांच्याकडे ५ हजार रुपये देण्यास सांगितले. तक्रारदार यांचे घरमालक यांनी कोंढवा पोलीस ठाण्याबाहेर तक्रारदाराकडून ५ हजार रुपये आरोपी समक्ष लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील, अर्जुन भोसले, सहाय्यक पोलीस आयुक्त नीता मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक असावरी शेडगे तपास करीत आहेत.