
गुंड टिपू पठाण याच्यावर महिलेची जमीन बळकविल्याचा गुन्हा
बेकायदा ताबा घेऊन शेड दिल्या भाड्याने, २५ लाखांची मागितली खंडणी
पुणे : हडपसर भागातील सय्यदनगर येथे दहशत माजविणारा गुंड टिपू पठाण आणि त्याच्या साथीदारांनी आणखी एका महिलेची जमीन बळकावून बेकायदा ताबा घेतला. त्यावर शेड उभारुन त्या भाड्याने देऊन पैसे कमावले. हा ताबा सोडण्यासाठी महिलेकडे २५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत एका ३१ वर्षाच्या महिलेने काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही महिला मुळची मुंबईतील कुर्ला परिसरातील रहिवासी आहे. तिच्या फिर्यादीनुसार, टिपू ऊर्फ रिझवान सत्तार पठाण, सादिक कपूर, एजाज पठाण, मेहबूब अब्दुल गफार शेख, जावेद गणी शेख, साजीद जिब्राईल नदाफ, इराफान नासीर शेख, अजीम उर्फ अंट्या महंमद हुसेन शेख, मतीन हकीम सय्यद, तन्वीर शकील शेख, इम्तियाज ख्वाजा पठाण(सर्व रा. सय्यदनगर, हडपसर), अजिंक्य बाळासाहेब उंद्रे (रा. मांजरी खुर्द) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २०२० पासून आतापर्यंत घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेची सय्यदनगर भागात जमीन आहे. गुंड टिपू पठाण आणि साथीदारांनी महिलेच्या जागेवर बेकायदा ताबा घेऊन पत्र्याची शेड बांधली. ती भाड्याने देऊन त्याच्याकडून दरमहा जागेचे भाडे घेत होते. या महिलेने पठाण टोळीला जागेवरचा ताबा सोडण्यास सांगितल्यावर त्याने जागेचा ताबा पाहिजे असल्यास, २५ लाख रुपये दे, अशी खंडणीची मागणी केली. तसेच त्यांनी या महिलेला तेथे जाण्यास विरोध करुन तुम्ही परत या जागेत आले तर जिवंत जाणार नाहीत, अशी जिवे मारण्याची धमकी दिली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील तपास करीत आहेत.
टिपू पठाण व त्याच्या साथीदारांवर यापूर्वी जमीन बळकाविल्याचा व ताबा सोडण्यासाठी खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल आहे. टिपू पठाणसह त्याचा भाऊ व काही साथीदारांना काळे पडळ पोलिसांनी अटक केली आहे. ते सध्या कारागृहात आहेत.
पठाण याची दहशत मोडून काढण्यासाठी पठाणसह त्याच्या साथीदारांची बँक खाती गोठविण्यात आली आहे. काळेपडळ पोलिसांनी पठाणसह साथीदारांची घराची झडती घेतली. तेथून जमीन व्यवहारासंदभार्तील कागदपत्रे, महागडी मोटार, तीन दुचाकी, तसेच गृहोपयोगी वस्तू असा माल जप्त करण्यात आला आहे. पठाणने केलेल्या बेकायदा बांधकामावर काळेपडळ पोलिसांनी महापालिकेच्या मदतीने नुकतीच कारवाई केली होती. या कारवाईत पठाण याचे कार्यालय, तसेच बेकायदा बांधकाम पाडून टाकण्यात आले होते. या कारवाईनंतर पोलिसांनी पठाण याच्यासह दहा साथीदारांच्या घरावर पोलिसांनी छापा टाकला. त्यांच्या घरातून पंखे, टीव्ही, वॉशिंग मशीन, महागडे फर्निचर असा चार ते पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.