
कुजलेल्या अवस्थेतील तरुणाच्या खुनाचा उलघडा
दादागिरी करत असल्याने सहकारी मजुरानेच केला होता खुन, भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी
पुणे : कात्रजमधील निंबाळकरवाडी भागात बेवारस अवस्थेत सापडलेल्या तरुणाची ओळख पटवून त्याच्या खुनाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी खुन करणार्या त्याच्या साथीदाराला अटक केली आहे.
सद्दाम उर्फ सलमान शेख (वय ३५, रा. निंबाळरकरवाडी, कात्रज) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी विक्रम चैठा रोतिया (वय ३२, रा. निंबाळरकरवाडी, कात्रज) याला अटक करण्यात आली आहे.
गुजर -निंबाळकरवाडी येथील गवतामध्ये ११ ऑक्टोंबर रोजी पोलिसांना कुजलेल्या व अळ्या पडलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाची तपासणी केल्यावर त्याचा खुन झाल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी परिसरात शोध घेतल्यावर त्याचे नाव सद्दाम ऊर्फ सलमान शेख (वय ३५, रा. गुजर निंबाळकरवाडी, कात्रज) असे असल्याचे समजले. आरोपीचा शोध घेत असताना पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी व पोलीस अंमलदार यांना मिळालेल्या माहितीवर त्याचा मित्र विक्रम रोतिया याने खुन केल्याचे समजले. तो गुजरवाडी भागात मिळून आला.
सद्दाम आणि विक्रम हे मजुरी करतात. दोघांनी निंबाळकरवाडीत भाड्याने खोली घेतली होती. दोघांमध्ये हातऊसने दिलेल्या पैशांवरुन वाद झाले होते. सलमान हा विक्रम याच्यावर दादागिरी करायचा. विक्रमला सर्व कामे करायला लावायचा. जेवण त्यालाच बनवायला सांगायचा. या सततच्या दादागिरीमुळे विक्रम याने रागाने फावड्याच्या दांडक्याने सलमान याला मारहाण करुन त्याचा खुन केला. त्यानंतर त्याने त्याचा मृतदेह घराच्या मागील बाजूस असलेल्या मोकळ्या जागेत टाकून दिला होता. त्याने हा खुन ५ व ६ ऑक्टोंबरच्या रात्री केला होता.
ही कामगिरी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, सहायक पोलीस निरीक्षक समीर शेंडे, पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी, पोलीस अंमलदार सागर बोरगे, सागर कोंडे, सचिन सरपाले, विठ्ठल चिपाडे, सौरभ वायदंडे, महेश बारवकर, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, मंगेश गायकवाड, किरण साबळे, तुकाराम सुतार, संदीप आगळे, मितेश चोरमोले व अभिनय चौधरी यांनी केली आहे.