
महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी मुरलीधर मोहोळ मैदानात
पुणे : महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत यंदा मोठी रंगत पाहायला मिळणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना या वेळी भाजपकडून केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी थेट आव्हान दिलं आहे.
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष म्हणून अजित पवार गेल्या तीन कार्यकाळांपासून कार्यरत आहेत. आता ते चौथ्यांदा अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणार आहेत. त्यांच्या विरोधात मोहोळ यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी केली आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष आणि भाजप क्रीडा आघाडीचे अध्यक्ष संदीप भोंडवे यांनी दिली.
या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष आमनेसामने येणार असून, यंदा ही निवडणूक बिनविरोध न होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची निवडणूक २ नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे.
दरम्यान, राज्य सरकारकडून मागील तीन राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठी दिलेल्या १२ कोटी ४५ लाख रुपयांच्या निधीचा हिशेब न दिल्याचा आरोप एमओएच्या महासचिवांवर आहे. त्यामुळे निवडणुकीआधीच वाद निर्माण झाले आहेत.
भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या घटनेनुसार आणि नव्या स्पोर्ट्स कोडनुसार, सलग तीन टर्म अध्यक्ष राहिल्यानंतर चौथ्यांदा पद भूषवणे नियमबाह्य ठरू शकते. त्यामुळे अजित पवार यांच्या चौथ्या कार्यकाळाची वैधता आणि या निवडणुकीचा निकाल या दोन्हीवरच क्रीडा क्षेत्रासह राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.