
संशयाची पाल चुकचुकली पतीने पत्नीला केली बेशुद्ध पडेपर्यंत मारहाण
खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल,वाघोली पोलिसांनी संशयी पतीला केली अटक
पुणे : पतीपत्नीच्या संसारात संशयाचे पाल चुकचुकली की त्यांचा संसार उद्धवस्त होण्यास वेळ लागत नाही. चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीला लाकडी दांडक्याने बेशुद्ध पडेपर्यंत मारहाण केल्याचा प्रकार केसनंदमध्ये समोर आला आहे. वाघोली पोलिसांनी पतीविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
सुशिला बिराप्पा खांडेकर (वय ४५, रा. लाडबा वस्ती, केसनंद) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे़ त्यांच्यावर खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत आहेत. पती बिराप्पा शंकर खांडेकर (वय ५०) याला अटक केली आहे. याबाबत त्यांचा मुलगा समर्थ बिराप्पा खांडेकर (वय २२) यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार केसनंदमधील त्यांच्या राहत्या घरी सोमवारी दुपारी साडेबारा वाजता घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खांडेकर दाम्पत्य मजुरी करते. मुलगा एका कंपनीत काम करतो. बिराप्पा हा आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर नेहमी संशय घेत होता. सोमवारी दुपारी त्यांच्यात यावरुन भांडणे झाली. तेव्हा बिराप्पा याने सुशिला हिला शिवीगाळ करुन तुला आज मारुनच टाकतो, अशी धमकी देऊन लाकडी दांडक्याने डोक्यामध्ये व नाकावर मारले़ समर्थ हा तेथे आला असता त्याच्या आईच्या कानातून, डोक्यातून रक्त येत होते. त्या जागेवरच बेशुद्ध पडल्या. मुलाने वडिलांकडे तुमच्याकडे काही पुरावा आहे का, असे विचारल्यावर बिराप्पा हा लाकडी दांडके तेथेच टाकून दुचाकीवरुन निघून गेला. मुलाने आईला रुग्णवाहिकेतून मनीपाल हॉस्पिटलमध्ये उपचाराकामी दाखल केले आहे. पोलीस उपनिरीक्षक शेंडगे तपास करीत आहेत.