
भौगोलिक संलग्नता पाळण्यात आली नसल्याचा आरोप
दलितांचे आरक्षण नाकारण्यासाठी प्रभागांची रचना बदलल्याचा आक्षेप
पुणे : मंगळवार पेठ आरक्षण बचाव कृती समितीच्यावतीने उच्च न्यायालयात प्रभाग रचनेविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेल्या प्रभाग क्रमांक २४ च्या रचनेला स्थगिती देऊन नव्याने प्रभागाची रचना करण्याची मागणी याचिकाकर्ते तसेच समितीचे समन्वयक एड. नितीन परतानी यांनी याचिकेद्वारे केली आहे. प्रभाग रचना करताना भौगोलिक संलग्नता पाळण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात आला असून दलितांचे आरक्षण नाकारण्यासाठी प्रभागांची रचना बदलल्याचा आक्षेप परतानी यांनी नोंदवला आहे.
याबाबत बोलताना परतानी म्हणाले, की कसबा गणपती-केईएम हॉस्पिटल या प्रभाग क्रमांक २४ ची रचना करताना भौगोलिक सीमा निश्चित करताना निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्यात आलेले नाही. अनेक ठिकाणी या सीमा तुटलेल्या आहेत. प्रभागांच्या सीमा निश्चित करताना नदी, प्रमुख रस्ते, रेल्वे ट्रॅक या सीमा पाळण्याचा संकेत आहे. या मूळ प्रभागात दलित आणि मुस्लिम समाजाची मते मोठ्या प्रमाणावर आहेत. ही मते फोडण्यासाठी प्रभागांची रचना चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्याचे ते म्हणाले. सूर्या हॉस्पिटलच्या आसपासच्या भागातील महत्वाच्या मतांचा भाग कापून तो प्रभाग क्रमांक १३ ला जोडण्यात आला आहे. तसेच, जुना बाजार, रेल्वे भराव वगैरे परिसर देखील नदीची सीमा न पाळता या प्रभागला जोडण्यात आला आहे.
नाना पेठेतील मुस्लिम बहुल भाग लक्ष्मी रस्त्याच्या सीमा न पाळता तोडण्यात आला. या प्रभागांच्या रचेत भौगोलिक संलग्नता पाळण्यात आलेली नाही. अनुसूचित जातीच्या मतदारांची मते या विभाजनामुळे कमी झाली. त्यामुळे दलित आरक्षण पडणार नाही याची दक्षता घेण्यात आली. हा एक प्रकारे दलीतांवर अन्याय आहे. परतानी म्हणाले की, आमच्या मागणीप्रमाणे सीमा बदलल्या तरी अन्य प्रभागांच्या रचनेवर परिणाम होणार नाही. निवडणूक लांबविण्याची आमची इच्छा नाही. त्यामुळे तातडीने याविषयावर सुनावणी घेण्याची मागणी त्यांनी केली आहे.