
सॉफ्टवेअर इंजिनियरला लाथाबुक्क्यांनी मारहाण
पूर्ववैमनस्यातून डोक्यात दांडुका मारुन केले जखमी, पोलिसांनी केली तिघांना अटक
पुणे : पूर्ववैमनस्यातून टोळक्याने सॉफ्टवेअर इंजिनिअरला लाकडी दांडुक्याने मारहाण करुन जखमी केले़ हडपसर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे़
याबाबत सॉफ्टवेअर इंजिनिअर मनोज रंजनकुमार सिंग (वय ४२, रा. मातृछाया बिल्डिंग, झेड कॉर्नर, मांजरी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी बाबु ऊर्फ विकी निवास कांबळे, सनी प्रकाश कांबळे, गोकुळ शिवाजी सानप (रा. झेड कॉर्नर, मांजरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांचे साथीदार प्रेमकुमार आणि सार्थक उत्तेकर (रा. झेड कॉर्नर, मांजरी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मांजरी येथील झेड कॉर्नर, ४० फुटी रोडवर शनिवारी रात्री साडेदहा वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज सिंग हे शनिवारी रात्री साडेदहा वाजता त्यांच्या घरासमोर रोडवर त्यांचा मित्र चेतन खैरनार याच्यासह बोलत थांबले होते. त्यावेळी एक कार त्यांच्या जवळून जोरात गेली़ थोड्या अंतरावर ती थांबली. कारमधून तिघे जण खाली उतरुन त्यांच्याकडे आले. त्यांच्या ओळखीचा सार्थक उत्तेकर हा त्यांना म्हणाला की, तू आमचे टारगेटवर आहेस़ तुला पाहून घेतो, अशी धमकी देऊन ते तेथून निघुन गेले. त्यानंतर त्यांनी आपले मित्र रमेश भिसे, संतोष सारवान व त्यांचा भाऊ अजितकुमार सिंग यांना बोलावून घेतले. झाला प्रकार सांगितला़ ते सर्व जण बोलत असताना एक कार त्यांच्याजवळ येऊन उभी राहिली. गाडीतून ४ ते ५ जण उतरले. त्यांच्यातील बाबु कांबळे याने त्यांच्या डोक्यात लाकडी दांडुका मारुन जखमी केले. त्याचबरोबर असलेल्या सनी कांबळे, प्रेमकुमार, सार्थक उत्तेकर, गोकुळ सानप यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांच्या मित्रांनी सोडविल्यानंतर ते पळून गेले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच हडपसर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.