
लॉ कॉलेज रोडवर पोलीस हवालदारावर हल्ला
गाडीला कट मारल्यावरुन मध्यरात्री झाला होता वाद, दोघांवर गुन्हा दाखल
पुणे : कामावरुन दुचाकीवरुन घरी जात असताना मध्यरात्री लॉ कॉलेज समोर गाडीला कट मारल्यावरुन झालेल्या वादात दोघांनी पोलीस हवालदारावर प्राणघातक हल्ला केला.
या घटनेत पोलीस हवालदार अमोल काटकर (वय ४२, रा. शिवाजीनगर पोलीस वसाहत) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल काटकर हे गुन्हे शाखेच्या युनिट ३ मध्ये कार्यरत आहेत. ते वारजे येथील युनिट ३ च्या कार्यालयातून मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास दुचाकीवर निघाले होते. कोथरुडवरुन एसएनडीटी येथील कॅनॉल रोडने ते लॉ कॉलेज समोर आले. त्यावेळी दोघे जण दुचाकीवरुन जात होते. कट मारल्यावरुन त्यांच्यात वादावादी झाली. तेव्हा दोघांनी अमोल काटकर यांच्या डोक्यात काठी मारुन गंभीर जखमी केले. त्यांच्यावर सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहे. डेक्कन पोलीस अधिक तपास करीत आहेत.