
इन्स्टाग्रामवर समर्थनार्थ स्टेटस ठेवणार्यांची समर्थ पोलिसांनी काढली धिंड
पुणे : आंदेकर टोळीच्या समर्थनार्थ इन्स्टाग्रामवर स्टेटस ठेवणार्या ५ जणांना समर्थ पोलिसांनी अटक केली आहे. त्यांची नाना पेठेतून धिंड काढत गॅगस्टर यांचे समर्थन कोणी करत असेल तर त्यांचीही गत अशीच होईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
मंथन सचिन भालेराव, फैजान शेख, पियुष बिडकर, अथर्व नलावडे, आणि ओंकार मेरगु अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी सांगितले की, आंदेकर टोळीेचे समर्थक यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवर आंदेकर समर्थनार्थ ‘बदला तो फिक्स, रिप्लाय होगा’ ‘आता फक्त बॉडी मोजा कुत्र्यांनो’ अशा व इतर स्टेटस स्टोरी ठेवल्याबद्दल यांच्याविरुद्ध समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे. या पाचही जणांना बुरखे घालून त्यांची नाना पेठेत जेथे आंदेकर टोळीचा प्रभाव होता, त्या परिसरातून फिरविण्यात आले. कोणी गुंडांचे समर्थन केले तर त्यांचीही अवस्था अशीच केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिली आहे.
आयुष कोमकर खुन प्रकरणात पोलिसांनी आंदेकर टोळीतील १५ जणांना अटक केली असून त्यांच्यावर मोका कारवाई केली आहे. त्याबरोबरच टोळीप्रमुख बंडु आंदेकर व त्याच्या कुटुंबाची बँक खाती जप्त केली. त्याचे बेकायदा बांधकामे उद्धवस्त केली. त्यांची मालमत्ता जप्त करण्याच्या दृष्टीने कायदेशीर पावले टाकली जात आहे. त्याचवेळी या टोळीचे समर्थन करणार्यांवर जबर बसविण्यासाठी अशा छुप्या पाठिराख्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.