
सत्तूरने वार, डोक्यात घातला दगड, वाघोलीतील पहाटेचा थरार
पुणे : किरकोळ कारणावरुन झालेल्या वादावादीमध्ये तिघा गुन्हेगार मित्रांनी त्यांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगारावर सत्तूरने वार करुन तसेच डोक्यात दगडाने घाव घालून निर्घुण खुन केल्याचा प्रकार समोर आला आहे़ ही घटना वाघोलीतील उबाळेनगर येथील कृष्णा लॉजसमोर पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
बादल शेख (वय २४, रा़ खराडी) असे खुन झालेल्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बादल शेख व त्याचे तिघे मित्र हे दुचाकीवरुन आपले घर येथे मध्यरात्रीच्या सुमारास आले होते़ तेथे त्यांची इतरांशी भांडणे झाली होती. आरोपी आणि बादल शेख हे एकमेकांचे चांगले मित्र आहेत. शेख त्याचे तीन मित्र यांच्यात मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास आपले घर येथे भांडणे झाली होती. त्यानंतर ते कृष्णा लॉज येथे रुम घेण्यासाठी आले.
लॉजचालकाने १२०० रुपये भाडे सांगितले. ते त्यांना जास्त वाटल्याने खाली येऊन ते गप्पा मारत होते. त्यावेळी त्यांच्यात बाचाबाची झाली. तेव्हा तिघांनी बादल शेख याच्यावर सत्तूरने वार करुन जखमी केले. तो खाली पडला असता त्यांनी त्याच्या डोक्यात दगडाने मारुन चेंदामेंदा केला. त्यानंतर हे मित्र पळून गेले. बादल शेख याच्यावर मारामारीचा गुन्हा दाखल आहे. त्याच्या मित्रांवरही गुन्हे दाखल आहेत.
या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी, वाघोली पोलीस ठाण्याचे अधिकारी अंमलदार यांनी घटनास्थळी धाव घेतली़. बादल शेख याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.