
खडक पोलिसांची कारवाई : तरुणाला अटक
पुणे : मेफेड्रोनच्या तस्करीप्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून ५ लाख ४६ हजारांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले आहे. खडक पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
अबरार ऊर्फ अबू इब्राहिम शेख (वय ३५, रा. एसआरए बिल्डिंग, कासेवाडी) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी कासेवाडी जवळील गणपती मंदिराजवळ उभा असून त्याच्याकडे मेफेड्रोन असल्याची माहिती पोलीस अंमलदार आशिष चव्हाण आणि नदाफ यांना मिळाली होती. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक अनिता तोंडे यांच्या पथकाने याठिकाणी सापळा लावून आरोपींना ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांचा संशय बळावल्याने त्याची झडती घेण्यात आली. त्यावेळी त्याच्याकडे प्लास्टिकची एक मोठी पिशवी आढळून आली. यासोबतच ४७ छोट्या झिप बॅग होत्या.
मोठ्या पिशवीत मेफेड्रोन असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तब्बल ५ लाख ६० हजारांचे ३१ ग्राम ६० मिलिग्रॅम मेफेड्रोन जप्त केले आहे. यासोबतच त्याचा मोबाईल देखील ताब्यात घेण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक शशिकांत चव्हाण, निरीक्षक (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अनिता तोंडे आणि त्यांच्या पथकाने केली.