
आंदेकर टोळीच्या बेकायदा बांधकामावर पोलिसांची कारवाई
बंडु आंदेकर कुटुंबाची अनाधिकृत घरे, पत्रा शेड, टपर्यासह स्वच्छतागृह जमीनदोस्त
पुणे : आयुष कोमकर खून प्रकरणाचा सूत्रधार आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत ऊर्फ बंडू आंदेकर आणि त्याच्या कुटुंबीयांनी घरासमोर केलेल्या बेकायदा बांधकामांवर पुणे पोलिसांनी महापालिकेच्या मदतीने कारवाई करत जमीनदोस्त केली.
आंदेकर कुटुंबीयांनी नाना पेठेतील डोके तालीम परिसरात बेकायदा बांधकामे केली आहेत. आंदेकर कुटुंबीयांचे ५२५ स्क्वेअर फुटाचा पत्रा शेड, ५२५ स्क्वेअर फुटाचे पक्के बांधकाम,१०० स्क्वेअर फुटाचा पत्रा शेड, १०० स्क्वेअर फुटाचे पक्के बांधकाम, ५० स्क्वेअर फुटाचा पत्रा शेड, ५० स्क्वेअर फुटाचे पक्के बांधकाम, आणि २०० स्क्वेअर फुटाचे शौचालय असे एकूण ८ पक्के बांधकाम महापालिकेने जेसीबीच्या सहाय्याने कारवाई करुन पाडून टाकले. ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस उपायुक्त ऋषीकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखालील समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते व त्यांच्या सहकार्यांनी केली.