
कुख्यात गुंड निलेश घायवळ आणि त्याच्या कुटुंबियांचे ३८ लाख रुपये गोठविले
निलेश, त्याची पत्नी, भाऊ, भावजय यांच्या १० खात्यातील रक्कम
पुणे : गॅगस्टर बंडु आंदेकर याची टोळी समुळ नष्ट करण्यासाठी त्याची आर्थिक रसद बंद करण्याचा प्रयत्न पोलिसांनी केल्यानंतर आता पोलिसांनी निलेश घायवळवर आपली नजर वळविली आहे. गुंड निलेश घायवळ, त्याची पत्नी, भाऊ, भावजय यांच्या १० बँक खात्यातील ३८ लाख २६ हजार रुपये गोठविण्यात आले आहे, असे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितले.
निलेश घायवळ हा स्वीत्झर्लंडमध्ये असल्याचे सांगण्यात येत आहे. इकडे त्याच्या टोळीवर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
निलेश घायवळ, त्याची पत्नी, भाऊ व भावजय यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांची विविध बँकांमध्ये असलेल्या संशयास्पद खात्यांवर आर्थिक गुन्हे शाखेने सील ठोकले आहे. या खात्यांमध्ये ३८ लाख २६ हजार रुपयांची रक्कम आहे.
निलेश घायवळ याला परदेशात पळून जाण्यास ज्यांनी ज्यांनी मदत केली. त्यांच्यावरही पोलिसांची कारवाई होणार आहे. त्याच्या टोळीतील इतर प्रमुख साथीदारांच्या मालमत्ता, गाड्या आणि बँक खात्यांची चौकशी सुरु करण्यात आली आहे.