
शेअर मार्केट ट्रेडिंग करणार्यालाच सायबर चोरट्याने घातला होता सव्वा दोन कोटींना गंडा
पुणे : शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करणार्या व्यावसायिकाची सव्वा दोन कोटी रुपयांच्या सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यातील १ कोटी रुपये आपल्या बँक खात्यात घेणार्या सायबर चोरट्यांच्या साथीदाराला पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सायबर पोलिसांनी मांजरीमधून अटक केली.
संतोष सदाशिक रुपनर (वय ४७, रा. मांजरी बुद्रुक) असे या चोरट्याचे नाव आहे. संतोष रुपनर याने खासगी व्यवसाय दाखवून जनसेवा इंडस्ट्रीज या नावाने अॅक्सीस बँकेत खाते काढले होते. या बँक खात्यात या फसवणुकीतील तब्बल १ कोटी ५ लाख रुपयांची रक्कम आली होती. सायबर गुन्ह्यामध्ये विविध राज्यात दाखल झालेल्या फसवणुकीच्या १२ तक्रारीमध्ये या बँक खात्याचा वापर झाला आहे. या बँक खात्यावर ३ कोटी ५३ लाख ८७ हजार ९३५ रुपयांचा व्यवहार झाल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे शेअर मार्केटमध्ये शेअर ट्रेडिंगचे काम करतात. त्यांना ३१० बुल्स अँड चाय या ग्रुपमध्ये तसेच ३०५ बुल्स अँड चाय या ग्रुपमधील समाविष्ट केले होते. दोन्ही ग्रुपमध्ये शेअर्स खरेदी विक्री व शेअर मार्केटसंबंधीची माहिती पाठविली जात होती.
त्यांना आम्ही सांगितलेल्या स्टॉक्समध्ये गुंतवणुक केल्यास १० ते १५ टक्के चांगला नफा मिळवून देण्याची खात्री देत होते. त्यांचा विश्वास बसण्यासाठी सुरुवातीला त्यांनी गुुंतवणुक केलेल्या रक्कमेवर जास्त नफा दाखविला. तो त्यांचे बँक खात्यात जमा झाल्याने त्यांचा विश्वास बसला. त्यानंतर त्यांनी सांगितलेल्या वेगवेगळ्या बँक खात्यावर फिर्यादी यांनी एकूण २ कोटी २४ लाख ५९ हजार ९९९ रुपये गुंतवणुक केली. त्यांच्या रक्कमेवर १० कोटी रुपये एवढा मुद्दल व नफा दाखविण्यात येत होता. त्यांनी पैसे काढण्याचा प्रयत्न केल्यावर आरोपींनी वेगवेगळे चार्जेस सांगण्यास सुरुवात केली. संशय आल्यावर त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
या गुन्ह्यातील सव्वा दोन कोटींपैकी १ कोटी ५ लाख अॅक्सीस बँक खात्यात घेतली असल्याचे निष्पन्न झाले होते. हे बँक खाते जनसेवा इंडस्ट्रीज प्रा. लि. या नावाने संतोष रुपनर याचे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सायबर पोलिसांनी स्वारगेट पोलिसांच्या मदतीने रुपनर याचा शोध घेऊन त्याला अटक केली.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, सहायक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, सहायक पोलीस निरीक्षक प्रविण स्वामी, पोलीस उपनिरीक्षक वैभव पाटील, सागर पोमण, रोहित डोळस, प्रकाश कातकाडे, विद्या पाटील, पोलीस अंमलदार दीपक भोसले, विनायक म्हसकर, हेमंत खरात, कृष्णा गवळी, श्रीकांत कबुले, अभिजित उकिरडे, अतुल लोखंडे, माधव आरोटे, सोपान बोधवड, संतोष सपकाळ, दिपाली चव्हाण यांनी केली आहे.