
संजीव मेहेंदळे : उत्तम कलाकार घडवणे ही काळाची आवश्यकता
पुणे : संगीत म्हणजे एकप्रकारे ईश्वराची साधना असून ती निर्मळपणे आत्म्याला घातलेली साद असते. ताणतणाव आणि स्पर्धेच्या आजच्या काळात उत्तम कलाकार घडवणे ही काळाची आवश्यकता बनली आहे. कला हीच मनुष्याला तणावमुक्त जीवन जगण्यास मदत करीत असते. अलीकडच्या काळात तर संगीताचा उपयोग उपचारांमध्ये देखील होऊ लागला आहे. त्याला ‘म्युझिक थेरपी’ असे म्हणतात. महाराष्ट्रात संगीताचे विविध प्रकार पाहायला मिळतात. शास्त्रीय-सुगम आणि लोकसंगीताने आपला सांस्कृतिक अवकाश समृद्ध केला आहे. अशा प्रकारच्या कला जोपासण्याचे काम संगीत विद्यालये करीत आहेत. कलाकारांना देखील समाजाने यथोचित सन्मान आणि प्रतिसाद द्यायला हवा, असे प्रतिपादन संगीतनाट्य आणि टीव्ही मालिका अभिनेते संजीव मेहेंदळे यांनी केले.
रागेश्री संगीत विद्यालयाच्यावतीने नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात आयोजित २१ व्या वार्षिक स्नेहसंमेलनात व्यक्त केले. यावेळी विद्यालयाच्या संचालिका गायत्री गोखले, संचालक सचिन गोखले, पत्रकार लक्ष्मण मोरे उपस्थित होते. मेहेंदळे, मोरे, गोखले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्यालयाच्या १०० विद्यार्थी-विद्यार्थिनींनी यावेळी विविध गीते सादर केली.
विशेष म्हणजे सर्वांनी विविध गटांमध्ये सामूहिक गीत गायन करून सर्वांना मोहित केले. प्रत्येक गटाने वेगळी वेशभूषा केलेली होती. प्रत्येक गटाला विविध नावे देण्यात आलेली होती.
श्रीदेवी, सुधीर मोघे, बाबूजी, कविता कृष्णमूर्ती, गीता दत्त, राजेश खन्ना, मन्ना डे अशी नावे या गटांना देण्यात आलेली होती. सहभागी विद्यार्थ्यांमध्ये ५ वर्षांच्या बालकापासून ते ८८ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकापर्यंतच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
यावेळी तबल्यावर सचिन गोखले, अभिजित पानवलकर, संवादिनीवर गायत्री गोखले, सिंथेसायजरवर संतोष कुलकर्णी होते. साथसंगत भाग्यदा गोखले, उन्मेष मोरे, जयंती शेट्टी, दीपक कुलकर्णी यांनी केली. यावेळी प्रेक्षागृह संपूर्ण भरलेले होते.
उपस्थित प्रेक्षकांनी सर्वच कलाकारांना उत्स्फूर्त दाद दिली. यावेळी विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. माजी मुख्याध्यापिका मंजुषा खेडकर, श्वेता मोरे, गीता ठकार, अपर्णा देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. भाग्यदा गोखले यांनी आभार मानले.