
प्रेमसंबंधात फसवणुक परिचारिकेची आत्महत्या : फसवणुक करणार्या प्रियकरावर पोलिसांनी दाखल केला गुन्हा
पुणे : लग्नाचे आश्वासन देऊन त्याने तिचा गैरफायदा घेतला. आपला कार्यभाग उरकल्यानंतर तिला मोबाईल व व्हॉटसअॅपवर ब्लॉक करुन लग्नास टाळाटाळ केल्याने मानसिक तणावात आलेल्या परिचारिकेने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
वैशाली त्रिभुवन (वय २४, रा. भारती स्टाफ गर्ल होस्टेल, धनकवडी, मुळ रा. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) असे या परिचारिकेचे नाव आहे. याबाबत तिचे वडिल जिजा अण्णा त्रिभुवन (वय ४३, रा. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी वैभव सातपुते याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार धनकवडीतील भारती स्टाफ नर्स होस्टेल येथे ८ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ४ वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी वैशाली ही भारती हॉस्पिटलमध्ये परिचारिका म्हणून नोकरी करत होती. या काळात तिची वैभव सातपुते याच्याशी ओळख झाली. त्याने तिच्याशी ओळख वाढवून प्रेमसंबंध निर्माण केले. तिला लग्नाचे आमिष दाखवून तिचा शारीरीक गैरफायदा घेतला. त्यानंतर त्याने वैशाली हिचा मोबाईल व व्हॉटसअॅप ब्लॉक करुन तिच्याशी बोलणे बंद केले. लग्नास टाळाटाळ केली. फिर्यादीच्या मुलीला शारीरीक व मानसिक त्रास दिला. या त्रासामुळे मानसिक तणावात येऊन वैशाली हिने होस्टेलमधील आपल्या रुममध्ये आत्महत्या केली. तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल पोलिसांनी वैभव सातपुते याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक गणेश मोहिते तपास करीत आहेत.




