
उच्च शिक्षित तरुणाला खडक पोलिसांकडून अटक
पुणे : दिवसभर खासगी बँकेत काम करणारा एक तरुण रात्री मटका रॅकेट चालवत असल्याचे समोर आले. मोबाईलवर ऑनलाइन पद्धतीने मटका जुगार चालवीत असलेल्या या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गुरुवारी रात्री 11 वाजून 40 मिनिटांनी ही कारवाई करण्यात आली. त्याच्यासह ऑनलाइन मटका खेळणाऱ्या तब्बल 39 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहुल दिलीपसिंग परदेशी (वय 42, रा. समर्थ अपार्टमेंट, धायरी) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. त्याच्यासोबतच विशाल शेळके (लोहिया नगर), सुरज ज्ञानेश्वर गायकवाड (खडकमाळ आळी), मुकेश सातपुते (पानघंटी चौक), प्रतीक बनकर (झगडेवाडी), विजयसिंह बाळारामसिंग परदेशी, शिवा धनगर (पद्मावती), सुनील वाघ (सिंहगड रोड), बालाजी दत्तात्रेय गट्टे, गणेश मारुती शेलार (सदाशिव पेठ), सचिन मधुकर सुपेकर (पर्वती दर्शन), सचिन पालवे (शिवतेज नगर), विलास दिवाने (खडकमाळ आळी), रहीम शेख उर्फ अब्दुल रहीम हजारी शेख (एमजी रोड), शुभम गोडसे, अण्णा शिंदे (बिबवेवाडी), शुभम सुरेश कापदुले (खडक माळ आळी), अक्षय सुभाष तेलवडे (कोंढवा) यांच्यासह अन्य जुगारींवर देखील गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई आशिष चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे.
आरोपी राहुल परदेशी हा घोरपडी पेठ येथील कै. निळू फुले जलतरण तलावाच्या मुख्य गेट समोर रस्त्यावर उभा राहून मोबाईलवर पैसे स्वीकारून ऑनलाईन मटका जुगार चालवीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी रात्री पावणे बारा वाजता या ठिकाणी सापळा लावून त्याला ताब्यात घेतले. त्यावेळी तो मोबाईलवर ऑनलाईन पैसे स्वीकारून मटकीच्या जुगाराचे आकड्याचे बुकिंग घेताना आढळून आला. तसेच 39 मोबाईल क्रमांक धारक हे ऑनलाईन मटका जुगार खेळताना देखील आढळून आले. पोलिसांनी हा मोबाईल, रोख रक्कम आदी साहित्य जप्त केले आहे. बँकेमध्ये नोकरी करणारा तरुण ऑनलाईन मटका जुगार चालवत असल्यामुळे खळबळ उडाली आहे.