
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील घटना : शस्त्र ताब्यात, विमाननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
लक्ष्मण मोरे
पुणे : शस्त्र बाळगण्याची हौस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका नेत्याच्या चांगलीच अंगलट आली आहे. विमानतळावर रिव्हॉल्वर व काडतुसे सोबत बाळगून ते विमानाद्वारे उत्तरप्रदेशातील वाराणसी येथे घेऊन जात असताना या नेत्याला सीआयएसएफ व विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱयांनी ताब्यात घेतले. त्यानंतर, त्यांची चौकशी करून विमाननगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. हा प्रकार शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर असलेल्या लेवल २ बी या स्क्रिनिंग पॉईटला घडला. चौकशी केल्यानंतर त्यांचे शस्त्र जप्त करण्यात आले आहे. त्यांना तपासासंबंधी नोटीस बजावून तूर्तास सोडण्यात आले आहे.
चंद्रकांत प्रभाकर बागल (वय ६३, रा. गादेगांव, ता. पंढरपुर, जि. सोलापुर) असे गुन्हा दाखल झालेल्या नेत्याचे नाव आहे. याप्रकरणी विमानतळ प्राधिकरणाचे सुजित बालाजी कांगणे (वय ३४, रा. निरगुडी रोड, शिवनगर, शिर्के कॉलनी, लोहगांव) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ कलम ३० अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पुणे विमानतळावर नोकरी करतात. ते शुक्रवारी ड्युटीवर असताना साधारण ते पुणे ते वाराणसी विमानामधून जाणाऱ्या बॅगेज व सामान याची तपासणी करीत होते. त्यावेळी आरोपीच्या सामानामध्ये भारतीय बनावटीचे एक रिव्हॉल्वर आढळून आले. त्या रिव्हॉल्वरसोबत ५ जिवंत काडतुसे आणि एक वापरलेल्या काडतुसाची पुंगळी आढळून आली.
हे सामान चन्द्रकांत बागल यांचे होते. बागल यांनी हे रिव्हॉल्वर व काडतुसे बाळगण्यासाठी परवानगी घेणे आवश्यक होते. भारत सरकारच्या ब्युरो ऑफ सिव्हील एव्हिअशन सेक्युरिटीज यांना यासंबंधी माहिती कळविणे आवश्यक होते. बागल यांच्याकडे या शस्त्राचा परवाना आहे. तसेच, हे शस्त्र केवळ महाराष्ट्रात बाळगण्याचा परवाना त्यांच्याकडे आहे. मात्र, हे शस्त्र राज्याबाहेर वाराणसी येथे घेऊन जात असताना सीआयएसएफ व विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱयांकडून बागल यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांना विमानतळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. याप्रकरणी संपूर्ण चौकशी करण्यात आली.
–चौकट–
यासंबंधी अधिक माहिती घेण्यासाठी संपर्क साधला असता, वरिष्ठ निरीक्षक गोविंद जाधव म्हणाले, की संबंधित व्यक्तीला सीआयएसएफ व विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱयांनी ताब्यात घेतलेले होते. त्यांनी पोलिसांकडे हे प्रकरण दिले. त्यांनी भारत सरकारने आखून दिलेल्या शस्त्र परवाना नियमावलीचे व अटी-शर्तीचे उल्लन्घन केल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तूर्तास ताब्यात घेण्यात आले आहे. ते कुटुंबीय व अन्य लोकांसोबत वाराणसी येथे निघालेले होते. त्यांना चौकशीसंबंधी नोटीस दिली असून प्रवासासाठी परवानगी देण्यात आली. ते वाराणसी येथे गेले आहेत.
याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत माने करीत आहेत.
बागल हे मुख्यत्वे सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आहेत. त्यांनी २०१४ साली पंढरपूर विधानसभा निवडणूक लढवली होती. पराभूत झाल्यापासून ते राजकारणात फारसे सक्रिय नाहीत.
#PuneAirport #BreakingNews #NCPLeader #RevolverCase #PuneNews #CrimeUpdate
#MaharashtraPolitics #PuneUpdates #NCPLatest #ViralNews #PuneCrime #IndiaNews