
– महापालिका आयुक्त नवल किशोर राम
पुणे : शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे काम सुसह्य आणि सुरक्षित व्हावे यासाठी आगामी काळात आधुनिक तंत्रज्ञानावर भर देणार असल्याची माहिती पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे ‘बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय (स्वायत्त)’ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (बार्टी) व सोशल स्टडीज फाउंडेशन यांच्या वतीने ‘शहरी स्वच्छता : यंत्राधारित सांडपाणी टाकी (सेप्टिक टाकी) स्वच्छता उपाय’ या विषयावरील राष्ट्रीय परिसंवादाच्या समारोपप्रसंगी राम बोलत होते.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र -कुलगुरू डॉ. पराग काळकर, अधिसभा सदस्य प्रसेनजीत फडणवीस, बार्टीचे आयुक्त सुनील वारे, उपायुक्त वृषाली शिंदे, बीएमसीसीचे प्राचार्य दीपक पौडेल, संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. प्रशांत साठे, डॉ. राजेश कुचेकर उपस्थित होते.
राम म्हणाले, “शासन आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन आणि योजना राबविल्या जातात. स्वच्छ भारत श्रेष्ठ भारत हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी या कर्मचाऱ्यांचा सन्मान आणि सुरक्षिततेसाठी समाजातील सर्व स्तरावरील घटकांनी सहयोग दिला पाहिजे.
काळकर म्हणाले, ” शिक्षण संस्था ज्ञानदानापुरत्या मर्यादित न राहता समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी नाविन्यपूर्ण कल्पनांवर संशोधन झाले पाहिजे.”
वारे म्हणाले, “विकसित भारताचा पाया स्वच्छतेत आहे. त्यासाठी स्वच्छता करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा विकास आवश्यक आहे त्यांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळवून दिल्या पाहिजेत.”
या परिषदेत 400 व्यक्तींनी सहभाग नोंदवला. इंडियन कौन्सिल ऑफ सोशल सायन्स अँड रिसर्च यांचे सहकार्य मिळाले.







