
‘रेकी’ करणाऱ्या आरोपीसह शस्त्र पुरविणारे गजाआड
गुन्हे शाखेच्या कारवाईमुळे गुन्हेगारी कट आला उघडकीस
पुणे : राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी रचण्यात आलेला कट उधळून लावण्यात गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाला यश आले आहे. आंदेकर टोळीने आंबेगाव पठार परिसरात सावज टिपण्यासाठी ‘रेकी’ सुरु केली होती. तसेच, एका सराईताला आंबेगाव पठार परिसरात एक खोली भाड्याने घेऊन राहण्यास पाठविण्यात आल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कृष्णा आंदेकर, दत्ता बाळू काळे (रा. डोके तालमीच्या मागे, गणेश पेठ), यश मोहिते, अमन पठान, यश पाटील, सुजल मिरगु, अमित पाटोळे, स्वराज वाडेकर (सर्व रा.नाना पेठ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अंमलदार सागर चंद्रकात बोरगे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांच्या सतर्कतेने गुन्हेगारी जगतातील ‘खून का बदला खून’ हे सूत्र घेऊन रचण्यात आलेला कट उधळला गेला. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी शस्त्र पुरविणाऱ्या सराईताला बेड्या ठोकल्या होत्या. तर, टेहळणी करणाऱ्या दत्ता काळे याला देखील ताब्यात घेण्यात आले. माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खूनाचा बदला घेण्यासाठी या गुन्ह्यातील एका आरोपीचा ‘गेम’ करण्याचा प्लॅन आंदेकर टोळीने रचला होता. याप्रकरणात आता पोलिसांनी भारती विद्यापीठ तसेच समर्थ पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत.
मागील वर्षभरात आंदेकर खून प्रकरणानंतर गुन्हे शाखेने शस्त्रास्त्र जप्ती, सराईत गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे व अटकसत्र अशा कारवाया सुरू ठेवल्या. गुन्हे शाखेने वॉच ठेवणाऱ्याला पकडून त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे यांना शस्त्रसाठा पुरविणाऱ्या एकाला पकडले आहे. त्याच्यावर समर्थ पोलिसांत आर्म अॅक्टचा गुन्हा नोंदवून एक पिस्तूल देखील जप्त केले आहे. पुर्व रेकॉर्ड पाहता तो वानवडी, कोंढवा या पोलिस ठाण्यातील गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे.