
तब्बल १७ वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर झाले वेगळे
पुणे : मराठी मनोरंजन क्षेत्रातील चाहत्यांना धक्का देणारी बातमी समोर आली असून प्रसिद्ध गायक आणि अभिनेते राहुल देशपांडे यांनी त्यांच्या पत्नी नेहा देशपांडे यांच्याशी घटस्फोट घेतला आहे. तब्ब्ल १७ वर्षांच्या संसारानंतर या दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. राहूल यांनीच सोशल मीडियावर याबाबतची पोस्ट करून याची माहिती चाहत्यांना दिली आहे. या घटनेमुळे चाहत्यांना धक्का बसला असून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
राहुल आणि नेहा यांच्या कुटुंबातील गोड क्षणांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमीच पाहायला मिळत असतात. त्यांची लहान मुलगी रेणुका ही चाहत्यांचीही लाडकी होती. त्यामुळे घटस्फोटाच्या या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. “लग्नाच्या १७ वर्षांनंतर आणि असंख्य आठवणींनंतर नेहा आणि मी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. सप्टेंबर २०२४ मध्येच आम्ही कायदेशीररीत्या विभक्त झालो आहोत. ही बातमी सर्वांसोबत शेअर करण्यापूर्वी मी थोडा वेळ घेतला, जेणेकरून खाजगीरित्या हे सगळं स्वीकारता येईल आणि विशेषतः आमच्या मुलगी रेणुका हिच्या हिताचा विचार करता सर्व काही विचारपूर्वक करता येईल. ती माझी सर्वोच्च प्राथमिक जबाबदारी आहे आणि मी नेहासोबत प्रेमाने सह-पालकत्व करण्यास वचनबद्ध आहे. आमच्यासाठी हा वैयक्तिकरित्या नवा अध्याय असला तरी पालक म्हणून आमचे नाते आणि एकमेकांबद्दलचा आदर कायम राहील. या काळात तुम्ही दाखवलेला गोपनीयता, समजूतदारपणा आणि आदर याबद्दल मी मनःपूर्वक आभारी आहे.”
या घोषणेनंतर सोशल मीडियावर चाहत्यांकडून मिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी धक्का व्यक्त केला तर काहींनी राहुल यांना या नव्या टप्प्यासाठी धैर्य व पाठिंबा दिला आहे.
#RahulDeshpande #MarathiSinger #RahulDeshpandeDivorce #NehaDeshpande #MarathiMusic #MarathiNews #CelebrityNews #BreakingNews #EntertainmentNews #MarathiEntertainment #DivorceNews #ViralNews #TrendingNews #RenukaDeshpande