
कर्नाटक-गोवा-पुणे पाठलाग : पोलिसांकडून शिताफीने कारवाई
पुणे : सोशल मीडियावर महिलेचे आक्षेपार्ह फोटो व व्हिडिओ प्रसारित करणाऱ्या आरोपीला सहकारनगर पोलिसांनी परराज्यातून थरारक पाठलाग करून अखेर जेरबंद केले आहे.
विक्रम चंद्रकांत बुटीया (वय ३८, रा. बागलकोट, कर्नाटक) असे आरोपीचे नाव असून तो ट्रक चालक म्हणून काम करतो. २ जुलै रोजी आरोपीने फिर्यादी महिलेला शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केली होती. त्यावेळी लाकडी बांबूने मारहाण करून तिला गंभीर जखमी केले होते. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ११८(१), ११५(२), ३५२ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता.
या तक्रारीचा राग मनात धरून ७ जुलै रोजी आरोपीने पीडितेचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केले व पुण्यातून पलायन केले. या कृत्यामुळे पीडिता तीव्र नैराश्यात जाऊन आत्महत्येच्या विचारापर्यंत पोहोचली होती. त्या वेळी भरोसा सेलने हस्तक्षेप करून पीडितेचे समुपदेशन केले आणि आत्महत्येपासून परावृत्त केले.
पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी तांत्रिक विश्लेषणासह गुप्त माहितीचा वापर केला. आरोपी ट्रकसह कर्नाटकातून गोव्याकडे गेल्याचे लक्षात आले. पोलिस अंमलदार अमोल पवार व किरण कांबळे यांनी गोव्यापर्यंत पाठलाग केला. नंतर आरोपी महाराष्ट्रात प्रवेश करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा तालुक्यातील आनंदी हॉटेल परिसरातून ताब्यात घेण्यात आले.
आरोपी विक्रम बुटीयाने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्या मोबाईलमधून आक्षेपार्ह फोटो व व्हिडिओ जप्त करण्यात आले आहेत. त्याला २० ऑगस्ट रोजी अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. सुरुवातीला २६ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी मिळाली होती. त्यानंतर न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
ही कारवाई अतिरिक्त पोलीस आयुक्त (पश्चिम) राजेश बनसोडे, परिमंडळ-२ चे उपायुक्त मिलिंद मोहीते, स्वारगेट विभागाचे सहायक आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक सागर पाटील, पोलीस उपनिरीक्षक बापू खुटवड, दशरथ मोहिते तसेच पोलीस अंमलदार अमोल पवार, किरण कांबळे, निखील राजीवडे, सागर सुतकर, महादेव नाळे, रविंद्र कदम, महिला पोलीस अंमलदार जयश्री शेळके आणि प्रज्ञा नावडकर यांनी सहभाग घेतला.
#SocialMediaCrime #CyberCrimePune #PunePolice #VikramButiyaArrest #WomanSafetyPune #SahakarnagarPolice #PoliceInvestigation #MaharashtraCrimeNews #KarnatakaGoaPune #CrimeNews2025 #PuneBreakingNews