
बेटिंग व गेमिंगमधील तोट्यामुळे घरातील सर्व दागिने, बचत केलेले पैसे आणि अगदी संपत्तीही गमावली
मुंबई : ऑनलाइन गेमिंगच्या व्यसनामुळे मुंबईतील एका व्यावसायिकाला तब्बल १२ कोटी रुपयांचा फटका बसला असून हि घटना उघडकीस आली आहे. उच्चभ्रू वस्तीत राहणाऱ्या या व्यावसायिकाने सततच्या बेटिंग व गेमिंगमधील तोट्यामुळे घरातील सर्व दागिने, बचत केलेले पैसे आणि अगदी संपत्तीही गमावल्याचे समोर आले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या व्यावसायिकाने मेहतन उभा केलेला व्यवसाय या गेमिंग व्यसनापायी बरबाद केला. कोविड काळात हा व्यावसायिक ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात अडकला. साधारण २०२१ मध्ये फेसबुकवर एका लोकप्रिय अभिनेत्रीची जाहिरात पाहण्यात आली. मोठा परतावा मिळेल असे या जाहिरामध्ये नमूद करण्यात आले. कोविड काळात व्यवसायात तोटा सहन करावा लागल्याने त्याने लिंकवर क्लिक केले आणि पॅरीमॅच अॅप डाउनलोड केले.
यासोबतच विविध ऑनलाइन गेमिंग अॅप्स आणि वेबसाईट्सवर खेळत होता. सुरुवातीला छोटे-छोटे पैसे लावून जिंकत असल्याने त्याचा आत्मविश्वास वाढला. सुरुवातीला त्यांना चांगला नफा मिळाला. त्यामुळे त्याचा विश्वास बसला. या अॅपशी संबंधित लोकांनी त्यांच्याशी संपर्क साधून बोनसच्या आश्वासनांसह मोठ्या ठेवी ठेवण्यास सांगितले.
या व्यावसायिकाने तीन वर्षांच्या कालावधीत २७ कोटी रुपये लावले. त्यातील १५ कोटी रुपये वसूल करण्यात यश आले. मात्र, उर्वरित १२ कोटी २२ लाख रुपये बुडाले. हा तोटा भरून काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात कर्जाच्या गर्तेत हा व्यावसायिक बुडाला. या घटनेची नोंद झाल्यानंतर पोलिसांनी चौकशी सुरू केली असून, संबंधित ऑनलाइन गेमिंग प्लॅटफॉर्मवर गुन्हेगारी कारवाई होऊ शकते का याचीही छाननी केली जात आहे.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, ऑनलाइन गेमिंग हे फक्त मनोरंजनापुरते राहिलेले नाही तर त्याचे रुपांतर जुगारामध्ये झाले आहे. त्यामुळे युवकांसह व्यावसायिकसुद्धा या सापळ्यात अडकत आहेत. यावर कठोर कायदेशीर नियंत्रणाची मागणी होत आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे समाजात एकच खळबळ उडाली आहे. “ऑनलाइन गेमिंगच्या नावाखाली आर्थिक व मानसिक हानी करणाऱ्या या कंपन्यांवर सरकारने तातडीने अंकुश ठेवला पाहिजे,” अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.