
न्यूयॉर्क सिटी : अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील सर्वात मोठी स्वयंसेवी संस्था असलेल्या फेडरेशन ऑफ इंडियन असोसिएशन्सने ((FIA : NY-NJ-CT-NE) रविवारी, १७ ऑगस्ट रोजी न्यूयॉर्कमध्ये ४३ वी वार्षिक इंडिया-डे परेड यशस्वीपणे (43rd Annual India-Day Parade Celebrates) आयोजित केली. शेकडो लोक या परेडमध्ये सहभागी झाले तसेच हजारो प्रेक्षकांनी मॅडिसन अव्हेन्यूवर हजेरी लावून भारतीय संस्कृती आणि वारशाचा हा उत्सव दिमाखात साजरा केला. या वर्षीच्या परेडचा मुख्य विषय होता ‘सर्वे सुखिनः भवंतु’ (सर्व लोक सुखी आणि समृद्ध होवोत), ज्यातून भारतीय-अमेरिकन समाजाची वैश्विक कल्याण आणि एकतेची भावना दर्शवण्यात आली. करिष्माई बॉलिवूड जोडी रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांनी ग्रँड-मार्शल्स म्हणून उपस्थिती लावून वातावरण भारावून टाकले आणि उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. यावेळी मान्यवर अतिथी व नामवंत कलाकारांनी ‘वंदे मातरम्’ आणि ‘भारत माता की जय’ अशा घोषणा देत अनेक देशभक्तीपर गीते व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करीत, राष्ट्रीय अभिमान आणि सांस्कृतिक एकतेचे सूर आळवले.
कार्यक्रमात बोलताना न्यूयॉर्क सिटीचे महापौर एरिक अॅडम्स यांनी भारतीय-अमेरिकन समाजाच्या महत्त्वपूर्ण योगदानाचे कौतुक केले. आयोजकांचे अभिनंदन करताना ते म्हणाले, “या सुंदर वातावरणात जमलेला हा जमावही तितकाच सुंदर आहे. आम्ही फक्त एवढेच म्हणू इच्छितो की या शहरासाठी तुम्ही करत असलेले बहुमोल कार्य यापुढेही असेच सुरू ठेवा.”
भारताचे न्यूयॉर्क येथील महावाणिज्यदूत बिनया एस. प्रधान यांनी प्रवासी भारतीयांचे स्वागत करताना सांगितले, “प्रवासी भारतीयांसाठी हा खरोखरच ऐतिहासिक दिवस आहे. यातून भारतीय-अमेरिकन समुदायाचे इथले महत्त्व आणि त्यांनी या देशात केलेली कामगिरी अधोरेखित होते.”
खासदार तसेच भारताच्या परराष्ट्र व्यवहार स्थायी समिती व शैक्षणिक सल्लागार समितीचे सदस्य सतनामसिंह संधू यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून भारतीय-अमेरिकन लोकांच्या योगदानाचे भरघोस कौतुक केले. त्यांच्यासह, श्री. ठाणेदार (अमेरिकेतील मिशिगनच्या १३ व्या काँग्रेसनल जिल्ह्याचे प्रतिनिधी), नीना सिंह (महापौर, मॉन्टगोमरी टाऊनशिप) आणि सिबु नायर (डायरेक्टर, एशियन अमेरिकन अँड पॅसिफिक आयलँडर अफेअर्स, न्यूयॉर्क स्टेट एक्झिक्युटिव्ह चेंबर) यांनीही उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
एफआयएचे अध्यक्ष सौरिन परिख यावेळी म्हणाले, “ही परेड आपल्या समाजाची ताकद आणि एकता दर्शवते. आपल्या प्रत्येकासाठी हा अभिमानाचा क्षण आहे.” तसेच, “४३ वी इंडिया-डे परेड ही भारतीय-अमेरिकन समाजाचा चैतन्यशाली आत्मा आहे, जी आपल्या परंपरांचा गौरव करते आणि आपली संस्कृती अमेरिकन मूल्यांसोबत किती सुंदररीत्या मिसळली आहे हे देखील दर्शवते. विविध समाजांना एकत्र आणणारे हे व्यासपीठ असून यातून आपल्या सामायिक वारशाचा उत्सव साजरा होतो,” असे गौरवोद्गार या प्रसंगी एफआयएचे चेअरमन अंकुर वैद्य यांनी काढले.
भारताच्या पूर्व ते पश्चिम व उत्तर ते दक्षिण भागाचे प्रतिनिधित्व करणारे ३४ आकर्षक देखावे, २१ पथके, आणि २० सांस्कृतिक कार्यक्रम परेडमध्ये सादर झाले. न्यू यॉर्कच्या ईस्कॉन मंदिराद्वारे आयोजित भगवान जगन्नाथ रथयात्रेने या परेडमध्ये आध्यात्मिक रंग चढवला. परेड मॅनहॅटनच्या मार्गावरून निघाली आणि भारतीय इतिहास व प्रांतीय विविधतेचे प्रतीक असलेल्या भव्य सांस्कृतिक, धार्मिक व कलात्मक देखाव्यांनी तिने सर्वांना मोहून टाकले. पारंपरिक वेशभूषेत सजलेले सहभागी भारतीय संगीताच्या ठेक्यावर नृत्य करत होते, ज्यामुळे भारताचा गौरवशाली वारसा आणि जागतिक कला-मनोरंजन क्षेत्रातील आधुनिक योगदान दोन्ही ठळक झाले.
टायटल स्पॉन्सर ‘क्रिकमॅक्स कनेक्ट’ यांच्या देखाव्यातून अमेरिकेत सुरू झालेल्या युवा क्रिकेट क्रांतीची झलक दाखवण्यात आली. ३८ सांस्कृतिक मंडपांमधून समुदाय प्रदर्शन व परस्परसंवादी कार्यक्रमांद्वारे भारताचा समृद्ध वारसा यावेळी प्रदर्शित करण्यात आला. परेडनंतर पारंपरिक ते आधुनिक अशा विविध भारतीय संगीत-नृत्यप्रकारांचे मोहक कार्यक्रम सादर करण्यात आले. आयोजक संस्था म्हणून फेडरेशन ऑफ इंडियन असोसिएशन्सने या आयोजनातून भारतीय संस्कृतीचा उत्सव साजरा करताना अमेरिकन समाजात एकात्मतेला चालना देण्याची आपली वचनबद्धता पुन्हा अधोरेखित केली. संस्थेची पारदर्शक, युवकाभिमुख कार्यपद्धती संपूर्ण उत्तर अमेरिकेतील भारतीय व्यक्ती व कुटुंबांना कार्यक्षम आणि प्रभावी सेवा पुरविते हे तिने पुन्हा एकदा सिद्ध केले.