
नांदेड सिटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पुणे : बांधकाम व्यावसायिकांकडून फ्लॅट खरेदीदारांची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून यामध्ये एका माजी नगरसेवकाच्या भावाचा समावेश आहे. ही घटना सर्वेनं ३१/२०, अंबाईमाता रोड, न-हे येथे असलेल्या अमृतस्पर्श बिल्डींग येथे घडला.
मिलींद सिताराम वस्ते (वय ५१, रा. प्रेमळ हनुमान मंदीराजवळ, लक्ष्मीनगर, पर्वती), सिध्दार्थ केवलचंद जैन (वय ५०, रा. अरिहंत बिल्डींग, लक्ष्मीनारायण थिएटर, स्वारगेट), गौतम जंयतीलाल सोळंकी (वय ५१, रा. १२८१ शुक्रवार पेठ), रणधीर जंयतीलाल सोळंकी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. यातील वस्ते हे भाजपाचे माजी नगरसेवलाचे चुलत भाऊ आहेत. तर, माजी नगरसेविकेचे दीर आहेत. याप्रकरणी सतिश दिंगबर रणदिवे (वय ४७, रा. स्वामीनगर चाळ, आंबेगाव पठार, धनकवडी) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वस्ते, सोळंकी आणि जैन यांनी नऱ्हे येथे अमृतस्पर्श या नावाने बांधकाम साईट सुरु केली आहे. वस्ते यांनी या बिल्डींगमधील फ्लॅट नं २०६ चा व्यवहार व्यापारी म्हणून फिर्यादीसोबत ठरविण्यात आला होता. ठरलेल्या व्यवहाराची सर्व रक्कम तसेच रजिस्ट्रेशन फी, लाईट मिटर, स्टॅम्पड्युटीपोटीची रक्कम चेकव्दारे फिर्यादीकडून घेतली. त्याप्रमाणे फ्लॅट नंबर २०६ साठी रजिस्टर खरेदीखताचा करारनामा करून दिला. त्यानंतर समजुती करारनाम्यामध्ये नमूद केलेल्या अटी व शर्तीप्रमाणे फिर्यादीस फ्लॅटचा ताबा देणे आवश्यक होते.
मात्र, या बिल्डींगचे बांधकाम पूर्ण न करता फिर्यादीच्या संमतीशिवाय वस्ते यांनी संगनमताने बिल्डींगचे काम त्यांचे भागीदार सोळंकी व जैन यांना रजिस्टर करारनाम्याने लिहून दिले. त्यानंतर सोळंकी व जैन यांनीदेखील या बिल्डींगचे बांधकाम अद्यापपर्यत पूर्ण केलेले नाही. तसेच त्यांना फ्लॅटचा ताबा दिलेला नाही. त्यामुळे फिर्यादीचा विश्वासघात करून त्यांच्याकडून १० लाख रुपये घेऊन आर्थिक फसवणूक केली. तसेच फिर्यादीप्रमाणेच अन्य ४ ते ५ तक्रारदारांकडून देखील फ्लॅट विक्रीपोटी रक्कम घेऊन त्यांना देखील अद्यापपर्यत फ्लॅटचा ताबा न देता त्यांचा देखील विश्वासघात करून आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.