
महापालिका नागरिकांचे जीव गेल्यावर लक्ष देणार का?; राष्ट्रवादी अर्बन सेलचे अध्यक्ष नितीन कदम यांचा सवाल
पुणे : तळजाई टेकडीवर रानडुकरांचा सुळसुळाट झाला असून महापालिकेचा आरोग्य विभाग डोळेझाक करीत असून महापालिका नागरीकांचे जीव गेल्यावर लक्ष देणार आहे का असा सवाल राष्ट्रवादी अर्बन सेलचे अध्यक्ष नितीन कदम यांनी उपस्थित केला आहे.
याबाबत कदम म्हणाले, की शहरातील टेकड्यांच्या सुरक्षेसाठी पुणे पोलीस, वन विभाग एकत्र आले आहेत. बोपदेव दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी शहरातील २२ प्रमुख टेकड्यांवर हायटेक सुरक्षा प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला असून याचा पायलट प्रकल्प बोपदेव घाटात सुरू झाला आहे. यामध्ये तळजाई टेकडीचा देखील समावेश आहे.
तब्ब्ल १०८ एकर परिसरामध्ये पसरलेल्या तळजाई टेकडीवर अनेक पुणेकर वॉकिंगला येत असतात. मात्र, या प्रसारात रानडुक्कर आढळल्यामुळे नागरिकांच्या मनामध्ये भीती पसरू लागली आहे. यावर वन विभाग व महापालिकेचे कर्मचारी कुठल्याही प्रकारची दखल घेत नसल्याचे दिसून येत आहे. नागरिकांची जीव गेल्यावर प्रशासन जागे होणार का असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नितीन कदम यांनी उपस्थित केला आहे.