
पोलिसांकडून न्यायालयात ‘बी फायनल’ रिपोर्ट सादर : वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांनी दिला दुजोरा
लक्ष्मण मोरे
पुणे : राज्याचे माजी मंत्री आणि विद्यमान आमदार तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज सावंत यांच्या अपहरणाप्रकरणी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाच्या तपासाची ‘फाईल’ पोलिसांनी बंद केली असून न्यायालयात ‘बी फायनल रिपोर्ट’ सादर करण्यात आला आहे. अपहरणाची तक्रार चुकीची असल्याचे समोर आले होते. ऋषिराज हे मित्रांसोबत बँकॉकला गेल्याचे समोर आले होते. पोलिसांकडून या प्रकरणी तपासाला सुरुवात देखील करण्यात आली होती. मात्र, प्रकरणाचा सर्व उलगडा झाल्यानंतर पोलिसांनी कायदेशीर सोपस्कार पार पाडत न्यायालयाला ‘बी फायनल रिपोर्ट’ सादर केला असल्याची माहिती पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
ऋषिराज यांचे अपहरण झाल्याची तक्रार १० फेब्रुवारी रोजी पोलिसांकडे देण्यात आली होती. त्यानंतर, पुण्यासह राज्यभरात एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी युद्धपातळीवर तपासाला सुरुवात केली होती. ऋषिराज ज्या मोटारीमधून गेले त्या गाडीचा शोध घेण्यात आला. ऋषिराज यांना चालकाने विमानतळावर सोडल्याचे समोर आले होते. त्यानंतर त्यांचा संपर्क होत नव्हता. त्यामुळे जेएसपीएमच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख राहुल सुभाष करळे यांनी फिर्याद दिली होती. तसेच, आमदार तानाजी सावंत यांच्याकडून पोलीस आयुक्त व वरिष्ठ मंत्र्यांशी संपर्क साधत मुलाचा शोध घेण्याचे आवाहन केले होते. पोलिसांनी हा विषय अतिशय गांभीर्याने घेत तपासाला सुरुवात केली होती.
मात्र, प्रत्यक्षात ऋषिराज हे मित्रांसोबत पुणे विमानतळावरुन खासगी चार्टर्ड प्लेनने बँकॉकला गेल्याचे समोर आले. अपहरणाचे प्रकरण असल्याने हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून हे विमान माघारी वळवण्यात आले. त्यानंतर, ते पुण्यात परतले होते. त्यांच्यासोबत त्यांचे दोन मित्र देखील होते. दरम्यान, सावंत यांनी ऋषिराज बिझनेस मिटिंगसाठी बँकॉकला गेल्याचे नंतर स्पष्ट केले होते. तसेच, याविषयी त्यांनी कोणालाच कल्पना दिलेली नसल्याने तानाजी सावंत आणि त्यांचे कुटुंब घाबरलेले होते असेही स्पष्ट केले होते. त्यांनी पोलिसांसमवते पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण देत नेमका काय प्रकार घडला याची माहिती दिली होती. दरम्यान, सावंत यांच्यावर यंत्रणा वेठीस धरल्याची टीका देखील झाली होती. पोलिसांनी देखील त्यावेळी हे अपहरण नसून गैरसमजातून तक्रार दाखल झाल्याचे स्पष्ट केले होते. हे प्रकरण घडून गेल्यानंतर पाच महिन्यांनी पोलिसांनी तपास बंद केला आहे. न्यायालयात पोलिसांनी नुकताच ‘बी फायनल रिपोर्ट’ सादर केला आहे. पुणे शहर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱयांनी याला दुजोरा दिला.