
महाराष्ट्र मंडळ बेल्जियमचा पुढाकार ; श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने गणेशोत्सवाकरिता मूर्ती सुपूर्द
पुणे : गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया… च्या जयघोषासह श्रीमंत दगडूशेठ गणपती की जय… चे स्वर आता थेट बेल्जियम मध्ये देखील निनादणार आहेत. महाराष्ट्र मंडळ बेल्जियम आणि शिरीष वाघमारे यांच्या पुढाकाराने बेल्जियम मध्ये दरवर्षी साज-या होणा-या गणेशोत्सवात यंदा प्रथमच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या प्रतिकृतीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. ही मूर्ती पुण्यातील मंदिरात विधीवत पूजन करुन नुकतीच महाराष्ट्र मंडळ बेल्जियमच्या सदस्यांकडे ट्रस्टतर्फे सुपूर्द करण्यात आली.
यावेळी उपक्रमाचे संयोजक शिरीष वाघमारे, तृप्ती वाघमारे, ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, राजाभाऊ पायमोडे, रोहित लोंढे आदी उपस्थित होते. श्रीं च्या मूर्तीची उंची अडीच फूट असून पुण्यामध्ये ही मूर्ती सुभाषनगरमधील श्री नटराज आर्टचे भालचंद्र उर्फ लाला देशमुख व राजेंद्र देशमुख यांनी साकारली. शिरीष वाघमारे, तृप्ती वाघमारे यांसह इतर सदस्यांनी ही मूर्ती स्विकारली. तब्बल१७५ देशांमध्ये गणेशोत्सव साजरा होत असून यानिमित्ताने बेल्जियम मधील भारतीयांचा उत्साह देखील वाखाणण्यासारखा आहे.
शिरीष वाघमारे म्हणाले, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचे बेल्जियम मध्ये आगमन हा महाराष्ट्र मंडळ बेल्जियमचा अभिमानाचा क्षण आहे. यामुळे परदेशात राहणाऱ्या भारतीय आणि महाराष्ट्रीय बांधवांसाठी गणेशोत्सवाचा आनंद घेता येणार असून यानिमित्ताने श्रद्धा आणि संस्कृतीचा सुवास थेट महाराष्ट्रातून बेल्जियम मध्ये पोहोचणार आहे. बाप्पाची बेल्जियम मधील स्थापना ही आमच्यासाठी श्रद्धा, परंपरा आणि एकतेचे प्रतीक ठरणार आहे.
महेश सूर्यवंशी म्हणाले, आता विश्वात्मके देवे, हे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचे वाक्य आहे, ते ख-या अर्थाने साध्य होत आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती हे जगभरातील गणेशभक्तांचे श्रद्धास्थान आहे. बेल्जियम मधील गणेशभक्तांची अपार श्रद्धा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीवर असल्याने श्रीं ची मूर्ती त्यांना देण्यात आली आहे. जवळपास अडीच हजार मराठी बांधव त्याठिकाणी सक्रिय आहेत. तसेच २० ते २५ हजार भारतीय नागरिक उत्सवात सहभागी होतात. लोकमान्य टिळकांची समाज एकसंध होण्याची भावना, भारतासह परदेशात देखील घडत आहे, याचा आनंद असल्याचे त्यांनी सांगितले.