
वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पुणे : एका जमिनीचा बनावट कागदपत्रांच्या आधारे आर्थिक व्यवहार करून ती जागा परस्पर विकून पल्सपीक रियल्टी एलएलपी या कंपनीची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उजेडात आला आहे. हा सर्व प्रकार २० मे २०२५ ते आज रोजी पर्यंत वाघोली परिसरात घडला. याप्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात संबंधितांविरोधात भारतीय न्याय संहिता ३१८ (४), ३३६ (३), ३३८, ३४० (२), ६१ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नोएल जोसेफ दास, ज्योती नोएल दास, रोशनी नोएल दास (सर्व रा. लुधियाना, पंजाब) जॅक्सन नोएल दास, रोहित जॅक्सन दास (दोघेही रा. नरेन हिल्स, आझाद नगर), राजेश जयभगवान गोयल, नवीन जयभगवान गोयल (दोघे रा. राधाकुंज बंगला, गंगाधाम, बिबवेवाडी), रितेश राजाराम मित्तल, निलेश राजाराम अग्रवाल, किशोर भरत मित्तल (रा. व्हिक्टोरिया गार्डन, येरवडा), रितेश सतीश अग्रवाल, समीर इमामबक्ष मुलानी (रा. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पल्सपिक रियल्टी एलएलपी कंपनीचे उमेश शंकरालाल कांकरिया (वय ४४, रा. ऐश्वर्या रेसिडेन्सी, कस्पटे वस्ती, वाकड) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या पलस्पेक रिअल्टी एलएलपी या कंपनीची वाघोली परिसरात जमीन होती. त्यांच्या कंपनीने ही जमीन खरेदी केलेली होती. तसेच, ही जमीन त्यांच्याच ताब्यात होती. या जमिनीचे कोणतेही सर्च रिपोर्ट आरोपींनी काढले नाहीत. तसेच, आरोपींचे नाव सातबाराच्या उताऱ्यावर कोणत्याही दप्तरामध्ये नोंदणी केलेली नव्हते. या जागेचे टायटल क्लिअर नसताना आणि आरोपींनी आपापसात फौजदारीपात्र कट रचून बनावट दस्त तयार केले. या बनावट दस्तांच्या आधारे फिर्यादीच्या कंपनीची जागा हडप करण्याच्या उद्देशाने तसेच स्वतःला आर्थिक फायदा मिळवून घेण्याच्या उद्देशाने या जागेची परस्पर विक्री करून आर्थिक व्यवहार केल्याचे तसेच या कंपनीची फसवणूक करण्यात आल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.