
हत्याराने वार करीत लोखंडी वस्तूने मारहाण केल्याची फिर्याद
पुणे : काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांच्यासह सात जणांवर मारहाण केल्याप्रकरणी तसेच हत्याराने वार करून जखमी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी लावलेला फलक काढण्यासाठी गेल्यानंतर तिवारी आणि त्यांच्या साथीदारांनी मारहाण केल्याचा आरोप फिर्यादी यांनी केला आहे. ही घटना ५ ऑगस्ट रोजी रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास तसेच ६ ऑगस्ट रोजी दोन वाजता विनायक मंडळाच्या जवळ असलेल्या निघोजकर मंगल कार्यालयाजवळ घडली.
याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये भारतीय न्याय संहिता १०९, ११८, २८९ (२), १९१, २९१, ३४९, भारतीय शस्त्र अधिनियम ४ (२५) व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१), (३), सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोपाळ शंकरराव तिवारी, हर्षद उर्फ नन्नू शंकर शिर्के, निखिल दिलीप जगताप, मुकुंद शंकर शिर्के आणि अन्य तीन अनोळखी व्यक्तींवर हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी स्वप्निल रामचंद्र मोरे (वय ३४, रा. २१४, रा. नारायण पेठ, केळकर रस्ता) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार स्वप्निल मोरे आणि त्यांच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सार्वजनिक रस्त्यावर एक काळ्या रंगाचा बोर्ड लावला होता. हा बोर्ड काढण्याकरता गोपाळ तिवारी आणि त्यांचे सहकारी त्या ठिकाणी गेले. हा बोर्ड काढत असताना फिर्यादी यांनी ‘हा बोर्ड काढू नका; तो बेकायदेशीर असल्यास पुणे महानगरपालिकेचे अधिकारी काढून घेतील’ अशी विनंती केली. त्यावेळी आरोपींनी फिर्यादीला ‘तू कोण मला सांगणारा’ असे म्हणून झटापट करण्यास सुरुवात केली. तसेच, त्यांच्या छातीमध्ये बुक्क्या मारल्या.
त्यानंतर रात्री पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी त्यांच्या मित्रांसह गप्पा मारत उभे असताना आरोपी त्या ठिकाणी तीन मोपेड गाड्यांवर आले. यातील हर्षद शिर्के यांनी त्याच्या हातातील लोखंडी हत्याराने फिर्यादी यांना बोटावर आणि पाठीवर वार करून जखमी केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. तसेच, निखिल जगताप यांनी त्याच्या हातातील लोखंडी वस्तूने फिर्यादीच्या डाव्या दंडाच्या हातावर जोरात मारल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले, सहाय्यक पोलीस आयुक्त साईनाथ ठोंबरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अरुण घोडके, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर, पी. एम. वाघमारे, संतोष मोरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) अरुण घोडके करीत आहेत.