
कोल्हेवाडीमध्ये हवेत तीन गोळ्या झाडल्याची घटना
पुणे : पुण्यामध्ये सतत भयंकर गुन्हेगारी घटनाला घडत आहेत. कुठे वाहन तोडफोड तर कुठे प्राणघातक हल्ले सुरूच आहेत. कोल्हेवाडीमध्ये देखील अशीच एक घटना घडली असून हे पुणे शहर आहे की मिर्झापूर अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे. नरवीर तान्हाजी मालुसरे रस्त्यावरील (सिंहगड रस्ता) कोल्हेवाडी येथे सोमवारी संध्याकाळी तरुणांनी किरकोळ कारणावरून हवेत गोळीबार केला. एक नव्हे तर तब्ब्ल तीन गोळ्या झाडण्यात आल्या. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. याप्रकरणी नांदेड सिटी पोलिसांनी सहा जणांना अटक केल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक अतुल भोस यांनी दिली.
साहिल अरविंद चव्हाण (२४), प्रशांत यशवंत चव्हाण (३४), आकाश भीमा चव्हाण (२४), अभिजित राजू चव्हाण (३१), गीतेश शंकर जाधव (२०) आणि मंदार यशवंत चव्हाण (३९, सर्व रा. खडकवासला) अशी अटक आरोपीची नावे आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळी कोल्हेवाडी येथे एका मोटारसायकलची कारला धडक बसली. या अपघातानंतर कारचालक अभिजित याने मोटारसायकलस्वाराला शिवीगाळ केली. त्यानंतर मोटारसायकलस्वाराने आपल्या मित्रांना बोलावले, तर अभिजितने देखील आपले भाऊ आणि नातेवाईकांना घटनास्थळी बोलावले. त्यानंतर दोन्ही गटांमध्ये रस्त्यावरच मारामारी सुरु झाली. यावेळी कारचालकाच्या एका मित्राने विरोधी गटाला घाबरवण्यासाठी हवेत गोळीबार केला.
“झाडलेल्या तीन गोळ्या या देशी बनावटीच्या पिस्तुलातून झाडल्या गेल्या होत्या. हे पिस्तूल साहिल आणि आकाश यांच्याकडे होते. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर हवेत तीन गोळ्या झाडण्यात आल्याचे समोर आले. सुदैवाने यात कोणीही जखमी झालेले नाही. आरोपीनी घटनेनंतर पळ काढला होता, मात्र आमच्या पथकाने त्यांचा माग काढून सोमवारी रात्री उशिरा अटक केली, असेही भोस यांनी सांगितले.