
तीन आरोपी अटकेत, २ लाखांच्या ४ दुचाकी हस्तगत
पुणे : औंध परिसरात मोटारसायकल चोरीच्या वाढत्या घटनांवर पोलिसांनी कारवाई करत तीन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून २ लाख रुपयांच्या ४ मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत.
नरेंद्र सुखदेव बुरुंग (वय १९), यशराज सुनील ढुमाळ (वय १९), प्रज्वल गंगाधर टिक्कर (वय १९, तिघेही रा. खडकी) अशी अटक तरुणांची नावे आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २९ जुलै २०२५ रोजी औंध पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मोहन कामकर व त्यांच्या पथकाला गस्त घालीत असताना जांभूळवाडी झोपडपट्टीजवळ काही संशयित व्यक्ती दिसल्या. त्यांना थांबवून चौकशी करण्यास सुरुवात करण्यात आली. त्यांच्यावर संशय बळावल्यानंतर अधिक सखोल तपास केला असता मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला.
या आरोपींनी पुणे शहर व परिसरातील विविध ठिकाणांहून मोटारसायकल चोरी केल्याचे उघड झाले आहे. त्यांनी चोरलेल्या गाड्या औंध, बाणेर, वाकड, हडपसर आदी ठिकाणी विकल्या असल्याचेही तपासात स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी या टोळीच्या मुसक्या आवळत चोरलेल्या चार मोटारसायकलसह एकूण २ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
ही कारवाई गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त निर्मल मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय घाडगे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजिंक्य चौधरी, पोलीस उपनिरीक्षक मोहन कामकर, अंमलदार विक्रांत निकम, ऋषिकेश कड, प्रतीक कोळेकर, राहुल सुतार, अमन देशमुख, सागर चव्हाण, किरण कांबळे यांनी केली.