
पुणे : खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये कासेवाडी या ठिकाणी सुरू असलेल्या हातभट्टीचा धंदा पोलिसांनी उध्वस्त केला. या कारवाईमध्ये पोलिसांनी २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये साडेचार हजार रुपयांच्या रकमेचा समावेश आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ कलम १२३, २७४, २७५ व महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५, ६८, ८६ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
राधा अनिल सोनवणे (वय ५०) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे. आशा तलवारे आणि संतोष शिंदे यांच्यावर देखील गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई आशिष चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे. ही कारवाई गुरुवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस कर्मचारी आशीष चव्हाण यांना कासेवाडी झोपडपट्टीमध्ये एका राहत्या घरामध्ये बेकायदेशीरपणे हातभट्टी दारूचा गुप्ता उघडण्यात आला असून गावठी हातभट्टी दारूचा साठा करून त्याची विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली होती.
त्यानुसार या ठिकाणी छापा टाकण्यात आला. पोलिसांनी राधा सोनवणे हिला ताब्यात घेण्यात आला. तिच्या घराची झडती घेतली असता त्यामध्ये प्लास्टिकच्या कॅनमध्ये मानवी शरीरास अपायकारक व हानिकारक रासायन तसेच अन्नपदार्थ एकत्र करून बनवलेली प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये ठेवलेली हातभट्टीची दारू आढळून आली. यासोबतच आशा तलवारे आणि संतोष शिंदे यांनी ही जागा दारूच्या गुत्त्यासाठी वापरण्यास दिलेली होती. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध देखील गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेंद्र कांबळे करीत आहेत.