
भक्तिमय वातावरणात संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे पुण्यनगरीत आगमन
पुणे : ‘एकतरी वारी अनुभवावी’ याची अनुभूती घेण्यासाठी विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीने लाखो वारकरी पंढरीच्या दिशेने निघाले आहेत. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याने पुण्यनगरीमध्ये शुक्रवारी आगमन झाले. संपूर्ण पुण्यनगरी संतांच्या आगमनाने भक्तीरसात न्हाऊन निघाली. दोन्ही पालख्यांच्या दर्शनासाठी पुणेकरांनी पालखी मार्गावर दुतर्फा गर्दी केली होती. वारकरी टाळमृदुंगाच्या नादात हरिनामाचा गजर करीत पुढे जात होते. शहरात ठिकठिकाणी पालखीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची झुंबड उडाली होती. हा अनुपम्य सुखसोहळा अनुभवताना वैष्णव भक्तांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या. पालखीमध्ये विराजमान असलेल्या पादुकांवर डोके ठेवताना अनेकजण भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
संत तुकाराम महाराजांची पालखी दूसरा मुक्काम आटोपून पुण्यात दाखल झाली. शुक्रवारी दुपारी दोनच्या दरम्यान पालखी रथाचे खडकीत आगमन झाले. त्यानंतर सायंकाळी पाचच्या सुमारास पालखी रथ अभियांत्रिकी महाविद्यालय चौकात दाखल झाला. चौकात पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कर्मचारी, होमगार्ड, महापालिकेचे कर्मचारी चौकात बंदोबस्तासाठी तैनात होते. संत तुकाराम महाराजांची पालखी चौकात दाखल होताच दर्शनासाठी भाविकांची एकच गर्दी जमा झाली. तसेच पालखीरथावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. भाविकांच्या गर्दीतून वाट काढीत पालखी रथ पुढे निघाला. संत तुकारामांच्या पालखीचा शुक्रवार आणि शनिवारचा मुक्काम हा नानापेठ येथील श्री निवडुंगा विठोबा मंदिरात असणार आहे.
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याने भल्या पहाटे आळंदीतून पंढरपुराकडे प्रस्थान केले. दुपारी तीनच्या सुमारास माऊलींचा पालखी रथ विश्रांतवाडीत दाखल झाला. भक्तिरसात न्हाऊन निघालेल्या भाविकांनी रथाचे स्वागत केले. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पालखीचे दर्शन घेतले. विश्रांतवाडी येथे भारतीय लष्कराकडून वारकऱ्यांना फळे तसेच पाणी वाटप करण्यात आले. पालखीच्या सोहळ्याच्या निमित्ताने विविध संस्थांनी संघटनांच्या वतीने वेगवेगळे उपक्रम राबविण्यात आले. धानोरी येथील ग्रामस्थांनी उत्साहात पालखी रथाचे स्वागत केले. सायंकाळी साडेसातच्या सुमारास माऊलींची पालखी अभियांत्रिकी महाविद्यालय चौकात दाखल झाली. हरीपाठ म्हणत वारकरी धावत पुढे जात होते. अभियांत्रिकी महाविद्यालय चौक, फर्ग्युसन रस्ता, खंडुजी बाबा चौक, टिळक चौक आणि लक्ष्मी रस्त्यावर भाविकांची मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी झाली होती. यावेळी महाराष्ट्रभरातून आलेल्या धारकऱ्यांनी तुकोबारायांच्या तसेच माऊलींच्या पालखीचे दर्शन घेतले. यावेळी भक्ती आणि शक्तीचा संगम झाल्याचे चित्र दिसले. भक्तिमय वातावरणात माऊलींच्या पालखीचा रथ भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात रात्री उशिरा विसावला.
वारकऱ्यांच्या सेवेसाठी नागरिकांचा पुढाकार
संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी रथासोबत शेकडो दिंड्यांमधून लाखो वारकरी पुण्यात दाखल झाले. देहू तसेच आळंदीकडून येणाऱ्या वारकऱ्यांसाठी नागरिकांनी ठिकठिकाणी पाणी वाटप, नाश्त्याची सुविधा, फळे वाटप, आरोग्य तपासणीसारख्या उपक्रमांचे आयोजन केले होते. जंगली महाराज रस्त्यावरील भोसले भुयारी मार्ग येथे नाभिक अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांचे मोफत केस कापून दिले. रस्त्यावर अनेक ठिकाणी रुग्णवाहिका उभ्या करून विविध संस्थांकडून वारकऱ्यांना आरोग्य तपासणी सेवा उपलब्ध करून दिल्या गेल्या.
रस्त्यावर रंगले भारुड
नांदेड जिल्ह्यातील नायगाव येथून आलेल्या दिंडीतील बळीराम बंडेवार यांनी जंगली महाराज मंदिरासमोर रस्त्यावर भारूड सादर केले. त्यांच्या भारुडाने उपस्थित सगळ्यांनाच काही काळ गुंतवून ठेवले. वारकऱ्यांसोबतच उपस्थित पुणेकरांनीही त्यांच्या भारुडाचा आनंद घेतला. त्यासोबतच शहरात वेगवेगळ्या ठिकाणी विसावलेले वारकरी हरिपाठ आणि भजनात दंग झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.