
तब्बल ८ गुन्हे उघड : एलसीबी आणि रांजणगाव पोलिसांच्या संयुक्त कारवाईत १० लाखांचा मुद्देमाल हस्तगत
पुणे : पाण्याची बाटली विकत घेण्याच्या बहाण्याने महिलांच्या गळयातील मंगळसुत्र जबरदस्तीने चोरुन नेणाऱ्या सराईत चोरट्याला अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखा व रांजणगाव पोलीस स्टेशनच्या संयुक्त कारवाईमध्ये जबरी जोरीचे ८ गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत. तब्बल १० तोळे २०० मिली गॅम वजनाचे सोन्याचे दागिने व मोटर सायकल असा एकुण १० लाख १० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
मारुती ऊर्फ गोविंद रामनाथ आंधळे (वय ३८, रा. लिंबोडी, ता. आष्टी, जि. बीड) असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याचा साथीदार शरद बापू पवार (रा. लोणी सय्यदमीर, ता. आष्टी, जि. बीड) हा पसार झाला आहे. रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात २५ मार्च रोजी जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी वंदना रोहिदास शेटे (वय ३३, रा. पिंपरी दुमाला, ता. शिरुर) यांच्या गळ्यातील ११ गॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण जबरदस्तीने हिसकावण्यात आले होते. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखा तसेच रांजणगाव पोलीस ठाण्याचे तपास पथक करीत होते. तपासा दरम्यान घटनास्थळांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासून चोरट्यांनी वापरलेल्या मोटारसायकलबाबत माहिती निष्पन्न केली. तसेच दरम्यानच्या काळात शिरुर, शिक्रापुर व पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील चाकण, आळंदी पोलीस स्टेशन तसेच अहिल्यानगर जिल्हयातील कर्जत पोलीस स्टेशन आदी ठिकाणी तपास पथके रवाना करण्यात आली.
अशा प्रकारचे गुन्हे करणारे अभिलेखावरील गुन्हेगार तसेच कारागृहांमधून सुटलेले गुन्हेगार यांची चौकशी सुरू करण्यात आली. घटनास्थळापासून ते बीड जिल्हयापर्यत सुमारे ३०० ते ३५० कॅमेरे तपासण्यात आले. तसेच सर्व घटनास्थळांवरील तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. सर्व घटनास्थळांवरील सीसीटीव्ही फुटेजचा अभ्यास करून आरोपींचा जाण्यायेण्याचा मार्ग निश्चित करण्यात आला. तब्बल दहा दिवस या रस्त्यावर स्थानिक गुन्हे शाखा व रांजणगाव पोलीस ठाण्याच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सापळे लावले. परंतु, आरोपी वारंवार चकवा देत होते. यासोबतच पोलिसांनी ‘खबरी’ देखील सक्रिय केले होते. खबऱ्याने हा गुन्हा मारुती आंधळे याने साथीदार शरद पवार याच्या मदतीने केल्याची माहिती दिली.
पोलीस अमंलदार उमेश कुतवळ यांना आरोपी आंधळे हा अहिल्यानगरवरुन शिरुरकडे येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार, स्थानिक गुन्हे शाखा व रांजणगाव पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शिरुर हद्दीत सतरा कमान पुलाच्या अलीकडे सापळा लावला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. त्याने शरद पवार याच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली. या आरोपींनी शिरुर, शिक्रापुर व पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील चाकण, आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत तसेच अहिल्यानगर जिल्हयातील कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशा प्रकाराचे गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपींची मोटार सायकल व एकूण ८ गुन्ह्यांमधील १० तोळे २०० मिली गॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा १० लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, रांजणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक दत्ताजीराव मोहिते, कुलदिप संकपाळ यांच्या पथकाने केली.