
१५१ कोटींचे अनुदान झाले प्राप्त : प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना
पुणे, दि. २४ सप्टेंबर, २०२५ : उन्हामुळे घराचे छत तापून एसीचे वीजबिल वाढविण्यापेक्षा त्याच छतावर प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतून सौर प्रकल्प साकारुन आपले वीजबिल शून्य करण्याचा पर्याय १८६९४ पुणेकरांनी पसंत केला आहे. या योजनेतून त्यांना १५१ कोटींचे अनुदान देखील मिळाले असून, ९०.६२ मेगावॅट इतकी वीजनिर्मिती होत आहे. या कुटुंबांची भविष्यातील विजबिलाची चिंता आता मिटली आहे.
घरगुती वीज ग्राहकांना त्यांच्या दरमहाच्या वीजबिलापासून मुक्तता देण्यासाठी तसेच त्यांना विजेबाबत स्वयंपूर्ण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूर्यघर योजनेची सुरुवात केली आहे. देशभरात या योजनेतून ५,८८९ मेगावॅट इतकी क्षमता विकसित झाली आहे. तर महाराष्ट्रात २,९१,८११ घरांवर प्रकल्प साकारले असून, त्याची क्षमता ११०० मेगावॅटवर पोहोचली आहे. पुणे परिमंडलातही या योजनेचा टक्का दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत ३१,६४९ घरगुती ग्राहकांनी सूर्यघरसाठी नोंदणी केली असून, पैकी १८६९४ घरांवर प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. त्यातून ९०.६२ मेगावॅट वीजनिर्मिती होत आहे. ७,३९७ प्रकल्पांचे काम अंतिम टप्प्यात आहे. ते देखील लवकरच कार्यान्वित होण्याच्या मार्गावर आहे.
महावितरण पुणे परिमंडलात गणेशखिंड मंडलामध्ये ७३१२, पुणे ग्रामीण मंडल ५१४६ व रास्तापेठ मंडलात ६२३६ प्रकल्प कार्यान्वित झाले असून, त्यांची स्थापित क्षमता अनुक्रमे ३८.२१, २१.०७ व ३१.३४ मेगावॅट इतकी आहे. अनुदानावितरणामध्येही अनुक्रमे गणेशखिंडमध्ये ६३५६ लाभार्थींना ६२.४ कोटी, पुणे ग्रामीण ४४८० लाभार्थींना ३६.४ कोटी व रास्तापेठ मंडलातील ५३५० लाभार्थींना ५२.५८ कोटी असे एकूण १५१ कोटींचे अनुदान पुणे परिमंडलातील लाभार्थींना मिळाले आहे.
- अनुदानाचे स्वरुप : ज्या ग्राहकांचा वीजवापर ३०० युनिटच्या घरात आहे, त्यांच्यासाठी ३ किलोवॅट क्षमतेचा सूर्यघर प्रकल्प पुरेसा आहे. यातून साधारणपणे ३०० ते ३६० युनिट वीज महिन्याला तयार होते. पहिल्या दोन किलोवॅटपर्यंत प्रतिकिलोवॅट ३० हजार रुपये तर ३ किलोवॅट प्रकल्पाला ७८ हजारांचे अनुदान केंद्र सरकारकडून मिळते. तर गृहनिर्माण संस्थांना या योजनेतून प्रतिकिलोवॅट १८ हजार रुपये प्रमाणे ५०० किलावॅट क्षमतेपर्यंतचे अनुदान दिले जाते.
- स्वस्तात कर्ज उपलब्ध – ज्यांना प्रकल्प बसविण्याची इच्छा आहे. परंतु, आर्थिक नियोजनामुळे शक्य होत नाही. अशांसाठी केंद्रसरकारने ‘जनसमर्थ’ पोर्टल विकसित केले आहे. सूर्यघर प्रकल्पाची नोंदणी महावितरणच्या https://www.mahadiscom.in/ismart/ या पोर्टलवर केल्यानंतर https://www.jansamarth.in/register पोर्टलवर कर्जाची मागणी करता येते. नामांकित राष्ट्रीय बँका ‘जनसमर्थ पोर्टल’द्वारे ९० टक्के कर्ज उपलब्ध करुन देतात. विशेष म्हणजे याचा व्याजदर गृहकर्जापेक्षाही कमी आहे.
पुणेकरांनी लाभ घ्यावा- सुनिल काकडे
पुणेकर सूर्यघर योजनेचे महत्व जाणतात. त्यांनी लवकरात लवकर नोंदणी करुन या योजनेत सामील व्हावे. महावितरणने ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन केली आहे. अनुदानही तातडीने प्राप्त होते. तसेच यासाठी लागणारे वीजमीटर सुद्धा महावितरणतर्फे मोफत दिले जात आहे.
सुनिल काकडे,
मुख्य अभियंता, महावितरण, पुणे परिमंडल.






