
Ola, TVS, Bajaj, Ather च्या वाहनांना वाढती पसंती
नवी दिल्ली : वाहनांच्या विक्रीसाठी भारत ही मोठी बाजार पेठ आहे. अनेक आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय कंपन्यांना ही बाजारपेठ खुणावते आहे. त्यातही इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढत चालली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ऑक्टोबर २०२४ मध्ये भारतीय इलेक्ट्रिक टू-व्हीलर बाजारात मोठी वाढ झाल्याचे पहायला मिळाले. या कालावधीत विक्रीमध्ये ८५ टक्के वाढ नोंदवली गेली. ओला इलेक्ट्रिक, TVS मोटर आणि बजाज यासारख्या प्रमुख कंपन्यांना याचा फायदा झाला आहे. या कंपण्याच्या इलेक्ट्रिक गाड्यांच्या विक्रीत मोठी वाढ झाल्याचे पहायला मिळाले.
सणासुदीच्या हंगामात झाली विक्रीत वाढ
सणांच्या काळात वाहन कंपन्या आकर्षक ऑफर देतात. अनेक ठिकाणी ‘एक्सचेंज’ ऑफर दिल्या जातात. त्यामुळे ग्राहक या कंपन्यांकडे आकर्षित होतात. त्याच कारणांमुळे विक्रीला उधाण आल्याचे पहायला मिळाले. इलेक्ट्रिक टू-व्हीलर सेगमेंटची विक्री वाढली असून १ लाख ३९ हजार १५९ युनिट्सपर्यंत ही वाढ पोचली आहे. जवळपास सर्वच टू-व्हीलर उत्पादक कंपन्यांच्या गाड्यांची मासिक आधारावर विक्रीत वाढ दिसून आली. तथापि, काही कंपन्यांच्या विक्रीत वार्षिक आधारावर घसरणही पाहायला मिळाली.
ऑक्टोबर २०२४ मध्ये विक्रीत ओला आघाडीवर
ऑक्टोबर २०२४ मध्ये एकूण १ लाख ३९ हजार १५९ युनिट्सची विक्री झाली. ऑक्टोबर २०२३ च्या तुलनेत ही वाढ ९५ टक्क्यांनी अधिक आहे. त्यावेळी ७५ हजार १६५ युनिट्स विकले गेले होते. सप्टेंबर २०२४ मध्ये ९० हजार ७ युनिट्स विकले गेले होते. त्याच्या तुलनेत मासिक आधारावरही ५४.६१ टक्के वाढ नोंदवली गेली आहे. ओला इलेक्ट्रिक या सेगमेंटमध्ये आघाडीवर राहिली. गेल्या महिन्यात ओलाने ४१ हजार ६५१ युनिट्सची विक्री केली. ऑक्टोबर २०२३ च्या तुलनेत ७४.३३ टक्के अधिकची ही वाढ होती. तर, मासिक आधारावर ६८.७७ टक्के वाढ झाली आहे.
TVS मोटरने ऑक्टोबर २०२४ मध्ये मासिक आधारावर बजाज ऑटोला मागे टाकले. TVS ने गेल्या महिन्यात २९ हजार ९१५ युनिट्सची विक्री केली, ज्यात वार्षिक आधारावर ८१.२३ टक्के आणि मासिक आधारावर ६५.२० टक्के वाढ नोंदवली गेली.
तर, बजाज ऑटोने ऑक्टोबर २०२४ मध्ये २८ हजार २३२ युनिट्सची विक्री केली आहे. ही वार्षिक आधारावर २११.२७ टक्के आणि मासिक आधारावर ४७.५३ टक्के अधिक आहे.
एथर एनर्जीच्या विक्रीतही वार्षिक आणि मासिक आधारावर वाढ झाली, ज्यात एथर रिज्टा हे मॉडेल सर्वाधिक विक्री झाले.
हीरो मोटोकॉर्पच्या विक्रीत वार्षिक आधारावर २७७.४७ टक्के वाढ झाली. तर, मासिक आधारावर ६९.६५ टक्के वाढ दिसून आली. अशा प्रकारे भारतीय बाजारात इलेक्ट्रिक टू-व्हीलर सेगमेंटने ऑक्टोबर २०२४ मध्ये चांगली प्रगती साधली आहे.