
मुंबई : बहन्मुंबई महानगरपालिकेचा 2025-26 चा अर्थसंकल्प आज जाहीर केला. मुंबई मनपाने आतापर्यंतचा सर्वाधिक 74 हजार 427 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला असून यामध्ये मुंबईतील पायाभूत सुविधांसोबतच शिक्षण, पर्यटन आणि प्रदूषण यावरही मोठ्या प्रमाणात भर देण्यात आला आहे. बीएमसी ही आशियातील सर्वांत श्रीमंत महानगरपालिका आहे. प्रशासकीय राजवटीतील आजपर्यंतचा सर्वात मोठा अर्थसंकल्प सादर झाला. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आणि प्रशासक भूषण गगरानी यांनी हा अर्थसंकल्प सादर केला.
मुंबईसाठी विशेष वातावरणीय बदलासाठी 113.18 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मुंबईमध्ये सुयोग्य जागी ‘लंडन आय’च्या धरतीवरती सार्वजनिक खाजगी भागीदारी मॉडेल अंतर्गत ‘मुंबई आय’ उभारण्यात येणार आहे. यासोबतच राणीच्या बागेतील प्राणी संग्रहालयात जिराफ, झेब्रा, सफेद सिंह जॅग्वार इत्यादी विदेशी प्राण्यांसाठीची प्रदर्शनी उभारण्यात येणार आहे. शहरातील कोळीवाड्यांच्या विकास करण्यासाठी आणि पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी 25 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
सध्या मुंबई महापालिकेच्या विविध बँकांमध्ये 81 हजार 774.42 इतक्या ठेवी आहेत. पालिकेच्या बँकांमधील ठेवीमधून 2023-24 आर्थिक वर्षात 6364.48 कोटी इतका निधी काढण्यात आला होता. 2024-25 पर्यंत 12 हजार 119.47 कोटी इतका निधी काढण्यात आला. 2025 -26 मध्ये 16 हजार 699.78 कोटी इतका निधी काढला जाणार असल्याचे अर्थसंकल्पात म्हटले आहे.
मुंबईमधील 2 लाख 50 हजार पैकी 50 हजार झोपडपट्टीमध्ये उद्योगधंदे सुरू आहेत. त्यांच्यावर मालमत्ता कर लावून झोपडपट्टीधारकांना सोयी सुविधा दिल्या जाणार आहेत. झोपडपट्ट्यांमधील व्यावसायिक मालमत्तांवर करामधून 350 कोटी महसूल अपेक्षित धरण्यात आला आहे. मुंबईमध्ये घनकचरा व्यवस्थापन खर्च वाढला आहे. नागरिकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी तसेच स्वच्छ आणि निरोगी मुंबईसाठी घन कचरा व्यवस्थापन वापरकर्ता शुल्क लागू करण्याचा विचार पालिकेचा आहे.
स्वच्छ, शाश्वत आणि सक्षम मुंबईसाठी कटिबध्द या मंत्राचा नारा देत महापालिका आयुक्तांनी अर्थसंकल्प सादर करताना वित्तीय शिस्त आणि शाश्वतता, अर्थसंकल्पीय तरतुदींच्या अनुषंगाने वित्तीय शिस्त, पायाभूत सेवा सुविधांचे सक्षमीकरण, गुणवत्तापूर्ण आरोग्य व शिक्षण व्यवस्था, स्वच्छ आणि शाश्वत पर्यावरण, सामाजिक उपक्रम, प्रशासकीय व कार्यालयीन कार्यक्षमता आदींवर भर देत अर्थसंकल्पाचा ताळमेळ साधण्याचा प्रयत्न केला.
अर्थसंकल्पात काय तरतूदी?
मुंबईमध्ये सुयोग्य जागी ‘लंडन आय’च्या धर्तीवर ‘मुंबई आय’ उभारणार
दहिसर जकात नाक्याच्या जागेवर फाइव्ह स्टार हॉटेल उभारणार
दहिसर ते भाईंदर पर्यंतच्या उन्नत मार्गासाठी ४ हजार ३०० कोटींची तरतूद
राणीच्या बागेत जिराफ, झेब्रा, सफेद सिंह, जॅग्वार इत्यादी विदेशी प्राणी आणणार
गोरेगाव मुलुंड लिंक रोडसाठी १ हजार ९५८ कोटी रुपयांची तरतूद
प्रभादेवी, भांडूप, मुलुंड, जुहू, मालाड येथील एकूण ३२ हजार ७८२ PAP सदनिकांच्या प्रस्तावांना मंजुरी
बेस्ट अनुदान : १००० कोटी रुपये
शिक्षण विभाग : ३२४१ कोटी रुपये
घनकचरा व्यवस्थापन विभाग : ५५४८ कोटी रुपये
पर्जन्य जलवाहिनी विभाग : ३०३९ कोटी रुपये
कोस्टल रोड प्रकल्प : १५४५ कोटी रुपये
रस्ते आणि वाहतूक विभाग : ६५१९ कोटी रुपये
पूल विभाग : ८३६९ कोटी रुपये
आरोग्य विभाग : १९५८ कोटी रुपये
प्रमुख रुग्णालये : २४५५ कोटी रुपये
वैद्यकीय महाविद्यालये : ५७९ कोटी रुपये
विशेष रुग्णालये : ३०६ कोटी रुपये
जल अभियंता विभाग : ४३७२ कोटी रुपये
पाणी पुरवठा प्रकल्प खाते : ४०५६ कोटी रुपये
मलनि:सारण प्रचालन विभाग : १९७२ कोटी रुपये
मलनि:सारण प्रकल्प खाते : ४३९ कोटी रुपये
मलनि:सारण प्रकल्प कामे : ६५३२ कोटी रुपये
नगर अभियंता विभाग : ३३९५ कोटी रुपये
विकास नियोजन विभाग : १८३१ कोटी रुपये
उद्यान आणि प्राणिसंग्रहालय : ७३१ कोटी रुपये
कोळीवाड्यांच्या विकासासाठी २५ कोटी रुपयांची ठोक तरतूद
विशेष वातावरणीय बदलासाठी ११३.१८ कोटी
आपत्ती व्यवस्थापन विभागासाठी ३०९ कोटींची तरतूद
गेल्या पाच वर्षांचा बीएमसीचा अर्थसंकल्प
2020-2021 अर्थसंकल्प: 33 हजार कोटी रुपये
2021-2022 चा अर्थसंकल्प: 39 हजार कोटी रुपये
2022-2023 अर्थसंकल्प: 45 हजार 949.2 कोटी रुपये
2023-2024 चा अर्थसंकल्प: 52 हजार 619.07 हजार कोटी रुपये
2024-2025 चा अर्थसंकल्प: 59 हजार 954 कोटी रुपये