
मिरा-भाईंदर-वसई-विरार पोलिसांनी केली कारवाई
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वत्र पोलिसांची नाकाबंदी सुरू असून संशयास्पद वाटणाऱ्या व्यक्ती व वाहनांची तपासणी केली जात आहे. मिरा-भाईंदर-वसई-विरार पोलिसांनी गुरुवारी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित नाकाबंदीमध्ये तीन वेगवेगळ्या वाहनांमधून तब्बल ५ कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त केली.
पहिल्या घटनेत नालासोपारा पोलिसांनी सीएमएस कंपनीचा लोगो असलेल्या एमएच ४३, बीएक्स ५४४३ या व्हॅनला अडवले. या वाहनात ३ कोटी ५ लाख रुपयांची रोकड होती. नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी संशयावरून या व्हॅनची तपासणी केली असता लोखंडी सूटकेसमध्ये बेहिशेबी रोख आढळली. ही गाडी गोरेगावहून विरारच्या दिशेने जात होती. या रकमेचे कुठलेही वैध दस्तऐवज सादर करण्यात आलेले नसल्याचे नालासोपारा पोलिसांनी सांगितले. निवडणुकीच्या अनुषंगाने या पैशांचा वापर केला जाणार होता का या दृष्टीने चौकशी केली जात आहे.
तर, मंडवी पोलिसांनी मुंबई-अहमदाबाद महामार्गावर दुसरी कारवाई केली. सीएमएस कंपनीच्याच दुसऱ्या एका व्हॅनला थांबवूनन तपासणी करण्यात आली. या वाहनात २ कोटी ८० लाख रुपये होते. वाहनचालक आणि अन्य एक व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. तर, तिसऱ्या प्रकरणात, नया नगर पोलिसांनी मीरारोड येथे एक छोटा टेम्पो थांबवला. या टेम्पोमधून १ कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त करण्यात आली. या टेम्पोच्या चालकाकडेही योग्य कागदपत्रे नव्हती. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा टेम्पो कुठून आला आणि कुठे चालला होता याची माहिती घेतली जात असल्याचे, असे नयानगर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
मिरा-भाईंदर-वसई-विरार पोलिसांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा अधिक कडक केली आहे. या तिन्ही घटनांचा तपास सुरू असून, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेहिशेबी रोख रकमेच्या वापराबाबत चौकशी करण्यात येत आहे.